भीषण आपत्काळाचा सामना करण्यासाठी साधनेचे बळ निरंतर वाढवण्याची आवश्यकता !

‘संपूर्ण देशात कोरोना महामारीची भीषणता वाढली होती. कर्नाटक राज्यही कोरोना संक्रमित वाढणार्‍या सूचीत अग्रस्थानी होते. त्यामुळे साधक आणि धर्मप्रेमी यांच्या मनामध्ये भीती अन् तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या आपत्काळात ‘साधक आणि धर्मप्रेमी यांना आधार वाटावा अन् साधनेसाठी प्रेरणा मिळावी’, यासाठी एका सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. साधक आणि धर्मप्रेमी यांच्या मनातील भीती अन् ताण दूर करून त्यांना दळणवळण बंदीच्या काळात आपल्या परिवारासह ‘परिस्थिती स्वीकारून साधना कशी करायची ? स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न करून गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना कशी करायची ? या संदर्भात मार्गदर्शन व्हावे’, या उद्देशाने कर्नाटक राज्याचे सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनाचे नियोजन करण्यात आले होते. या ‘ऑनलाईन’ मार्गदर्शनाचा लाभ १ सहस्र ८२० साधक आणि धर्मप्रेमी यांनी घेतला. त्या मार्गदर्शनातील काही सूत्रे येथे दिली आहेत.

(भाग १)


पू. रमानंद गौडा

१. समाज धर्माचरण करत नसल्यामुळे रज-तम पुष्कळ मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे समष्टी प्रारब्धही वाढणे, त्यामुळे पुढे पुष्कळ मोठ्या आपत्ती येणार असणे आणि या आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी साधनेची नितांत आवश्यकता असणे

सध्या समाजातील लोक साधना आणि धर्माचरण करत नाहीत. त्यामुळे वातावरणातील रज-तम वाढून त्याचा प्रत्येक गोष्टीवर परिणाम होत आहे. त्यामुळे समष्टी प्रारब्धही वाढले आहे. समष्टी पाप सर्वांनाच भोगावे लागते. या वाढलेल्या रज-तमाचा नाश करण्यासाठी भगवंत प्रकृती (निसर्ग) आणि मानव यांनाच माध्यम बनवतो. परिणामी ‘पुढील काळात मोठ्या घटना, नैसर्गिक आपत्ती आणि संसर्गजन्य रोग यांचे प्रमाण वाढणार आहे’, असे द्रष्टे, संत आणि भविष्यवेत्ते यांनी आधीच सांगितले आहे. पुढे येऊ घातलेल्या भीषण आपत्काळात सुक्याच्या समवेत ओलेही जळणार आहे. अशा भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी साधनेची नितांत आवश्यकता आहे.

२. आध्यात्मिक स्तरावरील उपाय हीच आपत्काळातील संजीवनी असणे

कोरोना महामारीसाठी ‘स्थुलातील कृमी आणि जिवाणू कारणीभूत आहेत’, असे दिसते. वास्तवात याची ८० टक्के कारणे ही आध्यात्मिक अन् २० टक्के कारणे भौतिक आणि मानसिक आहेत. यातील भौतिक कारणे दूर करण्यासाठी साधकांनी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे. मानसिक स्तरावर भीतीचा नाश करण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी मन स्थिर ठेवून स्वयंसूचना घ्याव्यात. शेष उरलेला ८० टक्के भाग आध्यात्मिक उपायांनी, म्हणजे आपली व्यष्टी आणि समष्टी साधना योग्य रितीने केल्यामुळे आपण रोग अन् भय यांपासून मुक्त होऊ शकतो. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी कोरोनाच्या प्रतिबंधनासाठी तीन वेळा ‘श्री दुर्गादेव्यै नमः।’ एकदा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ पुन्हा ३ वेळा ‘श्री दुर्गादेव्यै नमः।’ आणि एकदा ‘ॐ नमः शिवाय ।’, असा नामजप सांगितला आहे. (हा नामजप सनातनच्या चैतन्यवाणी ‘ॲप’वर उपलब्ध आहे.) हा नामजप आपण प्रतिदिन १०८ वेळा करायचा आहे. आध्यात्मिक साधनेमुळे आध्यात्मिक बळ वाढते. ‘कोरोनासारख्या जिवाणूंपासून रक्षण होण्यासाठी सर्वांनी भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक’, असे सर्व उपाय करावे. आध्यात्मिक स्तरावरील उपाय हीच आपत्काळातील संजीवनी आहे.

सौ. मंजुळा रमानंद गौडा

३. दळणवळण बंदीच्या काळात घर आश्रमासारखे सात्त्विक आणि पवित्र होण्यासाठी प्रयत्न करणे

कोरोना महामारीमुळे असलेल्या दळणवळण बंदीच्या काळात आपण बाहेर जाऊन सेवा करू शकत नाही. त्यामुळे घराची स्वच्छता करावी, घरातील वस्तू व्यवस्थित ठेवाव्यात, वास्तूशुद्धी करावी, वास्तूची रचना उत्तम करावी, म्हणजेच स्थुलातून वास्तूच्या शुद्धीचे प्रयत्न करावे. घराला आश्रमासारखे बनवून मन स्थिर ठेवण्यासाठी साधना म्हणून प्रयत्न करावेत.

४. दळणवळण बंदीमुळे निर्माण झालेली परिस्थिती ‘भगवंतानेच निर्माण केली आहे’, हे लक्षात घेऊन परिस्थिती स्वीकारणे

आज घरातून बाहेर जाऊन नोकरी करणारे आपल्या परिवारातील सदस्य (म्हणजेच पती, मुले, कुटुंबीय आज घरी राहून काम करत असल्याने) सर्व जण घरीच असतात. अशा वेळी प्रत्येकाशी जुळवून घेतांना स्वतःकडे न्यूनपणा घेऊन प्रयत्न केले पाहिजेत. ‘ही परिस्थिती भगवंतानेच निर्माण केली आहे’, असा भाव ठेवून प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार करावा. प्रत्येक परिस्थिती आपण साधना म्हणूनच स्वीकारली, तर आनंदच मिळतो.

५. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया, म्हणजे आत्म्याला परमात्म्याशी जोडणारी प्रक्रिया असल्यामुळे ती चिकाटीने, श्रद्धेने अन् सातत्याने करणे आवश्यक आहे

आपल्या जीवनात आणि साधनेत अडचणी निर्माण करणारे आपल्यातील स्वभावदोष दूर करण्यासाठी जितके तळमळीने प्रयत्न करू, तितक्या शीघ्रतेने आपल्यात पालट होतो आणि देवाण-घेवाण हिशोब लवकर संपतो. मन, बुद्धी आणि चित्त यांची शुद्धी झाली पाहिजे. अहं न्यून झाला पाहिजे. त्यासाठी गुरुदेवांनी सांगितलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया केली पाहिजे. ही सत्य-शोधनाची प्रक्रिया आहे. ही अंतिम सत्याला, म्हणजे आत्म्याला परमात्म्याशी जोडणारी प्रक्रिया असल्यामुळे आनंददायी आहे. ती आपण चिकाटीने, पूर्ण श्रद्धेने आणि सातत्याने केली पाहिजे.

६. आपत्काळात गुरुदेवांनी दिलेली सेवा त्यांचा प्रसाद म्हणून तळमळीने, दायित्व घेऊन आणि उत्तम नियोजन करून करणे आवश्यक असणे

सेवा म्हणजे गुरुदेवांनी दिलेला महाप्रसाद आहे. जे साधक तळमळीने, दायित्व घेऊन आणि परिश्रमपूर्वक सेवा करतात, त्या जिवांवर गुरुकृपा अखंड कार्यरत असते. जे जीव इतर जिवांना साधनेला जोडण्यासाठी सतत प्रयत्न करतात, त्यांना भगवंताचे सतत साहाय्य मिळते. संपत्काळात बाहेर जाऊन समष्टीत प्रसार करणे शक्य होते; पण आता कोरोना महामारीमुळे आपल्याला बाहेर जाणे शक्य नव्हते; म्हणून आपण ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून सेवा करत आहोत. त्यामुळे या कालावधीत ‘देवाने दिलेल्या या सेवेच्या संधीसंदर्भात आपण काय करू शकतो ?’, याचे चिंतन करूया. वेळ वाया न घालवता सर्व सेवांचे उत्तम नियोजन करून सातत्याने भावपूर्ण गुरुसेवा करण्याचा प्रयत्न करूया आणि सातत्याने सत्मध्ये रहाण्याचा प्रयत्न करूया.

७. ‘भगवंताप्रती उत्कट भक्ती आणि भाव आहे’, अशा जिवाची भगवंतच काळजी घेत असणे, केवळ एका भक्त प्रल्हादासाठी भगवंताने अवतार धारण केला असणे, अशी भक्त प्रल्हादासारखी उत्कट भक्ती करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक !

आजच्या काळात भक्तीभाव वाढवणे अनिवार्य आहे. भाव म्हणजे ‘ईश्वरच हवा’, अशी उत्कट इच्छा ! भाव असलेल्या जिवाला ‘भगवंत सतत आपल्या समवेत आहे’, अशी जाणीव असते. या जिवाची प्रत्यक्ष भगवंतच सतत काळजी घेतो आणि त्याच्यासाठी सर्वकाही करतो. अशा भक्तीभावाचे उत्तम उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हाद ! नृसिंहाचा अवतार केवळ भक्त प्रल्हादासाठीच झाला.  आपणही असा भक्त होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. आज गुरूंच्या कृपेने भाववृद्धी होण्यासाठी आपल्याला निरंतर भावसत्संग मिळत आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी श्रीगुरूंना अपेक्षित अशी साधना करूया आणि जन्माचे सार्थक करून घेऊया.

८. गुरुदेवांनी आजपर्यंत अनेक प्रसंगांत रक्षण केले असणे, पुढे येणार्‍या आत्काळातही तेच रक्षण करणार असणे, त्यासाठी केवळ त्यांना अपेक्षित अशी साधना करण्याचा आणि कृतज्ञताभावात रहाण्याचा प्रयत्न करूया !

आपल्या जीवनात गुरु आलेच नसते, तर आपल्या जीवनाला अर्थच उरला नसता. आपणही सर्वसामान्यांप्रमाणे भीती, ताण आणि दुःख यांतच राहिलो असतो. गुरुदेवांनी आपल्याला अनेक प्रसंग आणि परिस्थिती यांतून बाहेर काढले आहे. त्यांची दिव्यदृष्टी आपल्यावर असल्याने आज आपण जिवंत आहोत. आजच्या कठीण परिस्थितीतही त्यांनीच आपले रक्षण केले आहे. आपल्याला केवळ त्यांचाच आधार आहे. आपल्या सर्वांना भवसागरातून पार करण्यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. पुढील आपत्काळातही तेच आपले रक्षण करणार आहेत. आपण सर्वांनी त्यांना अपेक्षित अशी साधना करूया. गुरुदेवांच्या ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या महान कार्यात सहभागी होऊन आपल्या जीवनाचे सार्थक करून घेऊया. गुरुदेवांनी आजपर्यंत आपल्यासाठी जे काही केले आहे, त्याचे जीवनाच्या अंतापर्यंत स्मरण ठेवून आपण कृतज्ञताभावात राहूया.’

(क्रमशः)

– सौ. मंजुळा गौडा (पू. रमानंद गौडा यांच्या पत्नी) (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) मंगळुरू, कर्नाटक. (२.६.२०२१)

भाग २ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/619456.html