‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

  • कपडे खरेदी करतांना ते आकर्षक असण्यासह सात्त्विक असणे आवश्यक !

  • मनुष्याने सात्त्विक कपडे घातल्याने त्याला ईश्वरी चैतन्य ग्रहण करता येऊन त्याचे मन आणि बुद्धी सात्त्विक होते !

‘दिवाळीनिमित्त आपण कुटुंबियांसाठी मोठ्या हौसेने नवीन कपडे खरेदी करतो. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत विविध प्रकारचे ‘रेडीमेड’ कपडे (आयते शिवलेले कपडे) विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यांची मांडणी पुष्कळच आकर्षक केलेली असते. हे कपडे विविध प्रकारचे ‘डिझाईन’ (नक्षी) आणि रंगांमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे कपडे खरेदी करतांना व्यक्तीचे मन त्यांच्याकडे सहज आकर्षित होते आणि आवडीनुसार कपडे खरेदी केले जातात. कपड्यांचा व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांवर सूक्ष्म प्रभाव पडतो. आपल्या कुटुंबियांसाठी कपड्यांची निवड करतांना ते आकर्षक दिसण्यासह सात्त्विक असणेही आवश्यक आहे. सात्त्विक कपडे परिधान केल्याने आपल्याला त्यातील सात्त्विकतेचा लाभ होतो. सात्त्विक कपडे कसे ओळखावेत ? हेही आपण समजून घेऊया.

सौ. मधुरा कर्वे

१. कापडाचा प्रकार, रंग, कापडावरील वेलवीण (नक्षी) आणि कपड्याची शिलाई यांवर त्या कपड्याची सात्त्विकता अवलंबून असणे

प्रत्येक वस्तूत तिच्या गुणधर्माप्रमाणे चांगली किंवा वाईट स्पंदने असतात. आपल्या अवतीभोवती आणि वापरात असलेल्या अनेक वस्तूंच्या स्पंदनांचा आपल्यावर सतत परिणाम होत असल्यामुळे त्या वस्तू सत्त्वप्रधान असणे आवश्यक असते. अन्य कोणत्याही वस्तूंपेक्षा अंगावरच्या कपड्यांचा आणि स्वतःचा निकटचा संबंध असतो. कापडाचा प्रकार, रंग, कापडावरील वेलवीण (नक्षी) आणि कपड्याची शिलाई यांवर त्या कपड्याची सात्त्विकता अवलंबून असते.

१ अ. कापडाचा प्रकार : पॉलिस्टर, जॉर्जेट इत्यादी कृत्रिम धाग्यांपेक्षा सुती किंवा रेशमी इत्यादी नैसर्गिक धाग्यांपासून विणलेले कापड सात्त्विक असते. विविध प्रकारच्या कापडांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे केलेल्या चाचण्यांतून लक्षात आले की, सुती, रेशमी इत्यादी नैसर्गिक धाग्यांपासून बनलेल्या कापडांमध्ये नकारात्मक ऊर्जा नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आहे. याउलट कृत्रिम धाग्यांनी बनलेल्या कापडांमध्ये सकारात्मक ऊर्जा नसून पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आहे. काळ्या रंगाच्या सुती कापडामध्ये मात्र सकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळून आली. यातून ‘हिंदु धर्मात काळा रंग वर्ज्य करण्यास का सांगितले आहे’, हे लक्षात येते.

१ आ. कपड्यांचा रंग : पांढरा, निळा, पिवळा, फिकट गुलाबी इत्यादी रंग सात्त्विक, तर लाल, हिरवा इत्यादी रंग राजसिक आहेत आणि काळा इत्यादी रंग तामसिक आहेत. ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या चाचण्यांतून पांढर्‍या रंगात (१७ मीटर) सर्वाधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. त्या खालोखाल निळा, पिवळा, फिकट गुलाबी आणि हिरवा या रंगांमध्ये उतरत्या क्रमाने (अनुक्रमे १३ ते ७ मीटर) सकारात्मक ऊर्जा आढळून आली. उलट काळ्या रंगात सकारात्मक ऊर्जा काहीच नसून नकारात्मक ऊर्जा आढळून आली.

‘व्यक्तीने काळ्या आणि पांढर्‍या रंगांचे कपडे परिधान केल्यावर तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी तिच्या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांतून लक्षात आले की, तिने काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने तिच्यातील नकारात्मक ऊर्जा वाढली. याउलट तिने पांढर्‍या रंगाचे कपडे परिधान केल्यावर तिच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळून आली.

१ इ. कपड्यांवरील वेलवीण (नक्षी) : कपड्यांवरील नक्षीमध्ये सात्त्विक, राजसिक आणि तामसिक असे ३ प्रकार आहेत. कपड्यांवरची वेलवीण निवडतांना ती अर्थपूर्ण असावी, उदा. ठिपके, पाने, फुले आणि वेली. पानाफुलांची वेलवीण निवडतांना अणकुचीदार टोके असलेली पानेफुले नसावीत. वेलवीण कोमल (नाजूक) आणि आकर्षक असावी. वेलवीण पुष्कळ जवळ जवळ असल्यास त्या वेलविणींमधून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होतात. आकाराने चांगली वेलवीणही एकमेकांच्या पुष्कळ जवळ असेल, तर त्रासदायक स्पंदने निर्माण करते. वेलवीण जेवढी सुटसुटीत असेल, तेवढी तिच्यातून चांगली स्पंदने येतात. ‘कपड्यांवरील सात्त्विक, राजसिक आणि तामसिक वेलविणींमधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होतो’, हे अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली.

१ इ १. सात्त्विक वेलविणीतून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : सात्त्विक वेलविणीत निळ्या रंगाच्या एकसारख्या पार्श्वभूमीवर (प्लेन बॅकग्राऊंडवर) पांढर्‍या रंगाची लहान आणि सारख्याच आकाराची कोमल (नाजूक) फुले आहेत; तसेच त्यांची रचना सुटसुटीत आहे. त्यामुळे सात्त्विक वेलविणीतून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.

सात्त्विक वेलविण

१ इ २. राजसिक वेलविणीतून अल्प प्रमाणात सकारात्मक स्पंदने आणि अधिक प्रमाणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : राजसिक वेलविणीत गुलाबी रंगाच्या छटांमध्ये लहान-मोठ्या आकाराची फुले आणि तपकिरी रंगाची टोकदार पाने आहेत; तसेच त्यांची रचना सुटसुटीत नसून एकमेकांच्या पुष्कळ जवळ आहे. त्यामुळे राजसिक वेलविणीतून अल्प प्रमाणात सकारात्मक स्पंदने आणि अधिक प्रमाणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.

राजसिक वेलविण

१ इ ३. तामसिक वेलविणीतून पुष्कळ नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे कारण : चाचणीतील तामसिक वेलविणीत काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर लहान-मोठ्या आकारांतील कवट्यांच्या आकृत्या आहेत. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हे अध्यात्मातील एक तत्त्व आहे. यानुसार कोमल टवटवीत फूल पाहिल्यावर मनाला आनंद जाणवतो; याउलट कवटीच्या आकृतीकडे पाहून मनात भय निर्माण होऊन अस्वस्थता जाणवते. फुलांमधून आनंदाची, तर कवट्यांमधून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होतात.

तामसिक वेलविण

२. सात्त्विक अन् असात्त्विक कपडे परिधान केल्याने स्त्रियांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

जीन्स, टी-शर्ट यांसारखी परकीय परंपरेतून आलेली वेशभूषा ही सध्या हिंदु स्त्रीच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनली आहे. याउलट हिंदु संस्कृतीची ओळख सांगणार्‍या पारंपरिक नऊवारी साडीचे अस्तित्व आता बहुतांश खेडेगावापुरतेच सीमित राहिले आहे. व्यक्तीच्या वेशभूषेचा परिणाम नकळत तिच्या मनोवृत्तीवर होत असतो. टी-शर्ट, जीन्स यांसारख्या सध्याच्या प्रचलित राजसिक-तामसिक वेशभूषेमुळे स्त्रीची वृत्ती उच्छृंखल आणि भोगवादी बनते, तर सहावारी अन् नऊवारी साडी या सात्त्विक वेशभूषेमुळे स्त्रीची वृत्ती शालीन आणि धर्माचरणी बनते. धर्माचरणातून ईश्वराप्रती भक्तीभाव निर्माण होऊन व्यक्तीचा प्रवास ईश्वरप्राप्तीकडे होऊ लागतो.

पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते की, स्त्रीने असात्त्विक कपडे परिधान केल्याने तिच्यातील नकारात्मक ऊर्जा वाढली. याउलट तिने सात्त्विक कपडे परिधान केल्याने तिच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळून आली.

३. लहान मुले आणि स्त्री-पुरुष यांचे ‘फॅशन’चे कपडे

लहान मुले आणि स्त्री-पुरुष यांच्यासाठी बाजारपेठेत नवनवीन ‘फॅशन’चे कपडे (फ्रॉक, टी-शर्ट, जीन्स् पँट, शर्ट-पँट, पंजाबी पोशाख, घागरा-चोळी, साडी इत्यादी) विक्रीसाठी उपलब्ध असतात. हे कपडे दिसायला अतिशय आकर्षक असतात. यातील काही निवडक कपड्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. चाचणीतील सर्वच कपड्यांमध्ये अल्प-अधिक प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली; पण तिचे प्रमाण ‘जीन्स् पँट’मध्ये सर्वाधिक आहे. साडीमध्ये अत्यल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आणि सर्वाधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली.

लहान मुले आणि स्त्रिया यांच्या कपड्यांवर शिलाईचे प्रमाण अधिक असते. कपड्यांवर शिलाई जेवढी अधिक तेवढी त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा अधिक असण्याची शक्यता असते. याउलट कपड्यांवर न्यूनतम शिलाई केली असेल, तर त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा अत्यल्प असते किंवा नसते. याचाच प्रत्यय या चाचणीतून आला.

४. सात्त्विक कपडे कसे ओळखावेत ?

बहुतांश कपडे दिसायला अत्यंत आकर्षक असतात; पण ते सात्त्विक असतीलच, असे नाही. कपड्यांतील मायावी स्पंदनांमुळे आपण त्यांच्याकडे सहज आकर्षित होतो. त्यामुळे कपड्यांकडे स्थूल डोळ्यांनी पहाण्यापेक्षा मनाला काय जाणवते, हे अभ्यासणे आवश्यक आहे.

कपड्यांकडे पाहून मन प्रसन्न होणे, कपड्याचा रंग किंवा नक्षी यांकडे पाहून मन आनंदी होणे किंवा शांत वाटणे, कपड्यांना स्पर्श केल्यावर ‘मनाला चांगल्या संवेदना जाणवणे’, असे अनुभव आल्यास ‘कपडे सात्त्विक आहेत’, असे समजावे. याउलट कपड्यांकडे पाहून मनाला जडपणा जाणवणे, कपड्याचा रंग किंवा नक्षी यांकडे पाहू नये असे वाटणे किंवा त्रासदायक जाणवणे, कपड्यांना स्पर्श केल्यावर मनाला त्रासदायक संवेदना जाणवणे इत्यादी अनुभव आल्यास कपडे असात्त्विक आहेत, असे समजावे आणि ते घेणे टाळावे.

५. कपडे विकत घेतल्यावर त्यांची शुद्धी करून मगच ते वापरा !

पूर्वी नवीन कपडे विकत घेतल्यावर ते प्रथम देवासमोर ठेवण्याची पद्धत होती. देवघरातील देवतांकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याने कपडे भारित होतात, तसेच ‘देवाच्या कृपेने कपडे वापरायला मिळत आहेत’, असा कृतज्ञताभावही निर्माण होण्यास साहाय्य होते. सध्या बाजारपेठेतील रज-तमप्रधान वातावरणामुळे कपड्यांवर त्रासदायक आवरण येण्याची दाट शक्यता असते. कपड्यांची शुद्धी न करता ते वापरल्यास त्यातील त्रासदायक स्पंदनांचा त्रास होतो. त्यामुळे कपड्यांची शुद्धी करून मगच ते वापरावेत.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.९.२०२२)

ई-मेल : [email protected]

विकृत वेशभूषा टाळून सात्त्विक वेशभूषा करणे श्रेयस्कर !

आजकालची तरुण पिढी ‘फॅशन’च्या नावाखाली चित्रविचित्र आकृत्या असलेले, चटेरीपटेरी (चित्रविचित्र) रंगांचे, जीन्स-स्ट्रेचेबल्स यांसारखे तोकडे आणि घट्ट बसणारे, अशा नाना प्रकाराचे कपडे वापरते. ही सर्व विकृत वेशभूषा आहे. विकृत वेशभूषा म्हणजे रज-तमात्मक स्पंदने निर्माण करणारी वेशभूषा. अशा वेशभूषेमुळे मनुष्याची बुद्धी विकृत बनते. तो दुष्प्रवृत्तींचा गुलाम बनतो, काम-क्रोधादी षड्रिपूंच्या अधीन होतो आणि त्याच्यावर सूक्ष्मातील वाईट शक्तींची आक्रमणे होतात. याउलट मनुष्याने सात्त्विक कपडे घातल्याने त्याला ईश्वरी चैतन्य ग्रहण करता आल्यामुळे त्याचे मन आणि बुद्धी सात्त्विक होतात. तो सदाचरणी आणि विवेकी बनतो, तसेच त्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासही साहाय्य होते.

– सौ. मधुरा कर्वे 

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.