संगीतभूषण (कै.) पं. राम मराठे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त…
सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि नट संगीतभूषण (कै.) पं. राम मराठे यांचा जन्म होऊन १०० वर्षे पूर्ण झाली असून, १०१ वे वर्ष चालू आहे. (जन्मदिनांक २३.१०.१९२४ आणि मृत्यूदिनांक ४.१०.१९८९) त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त त्यांचे सुपुत्र शास्त्रीय गायक पं. संजय मराठे यांनी पं. राम मराठे यांची उलगडलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. पं. संजय मराठे यांनी त्यांचे वडील (कै.) पं. राम मराठे यांची उलगडलेली गुणवैशिष्ट्ये !
१ अ. उत्तम गायक : ‘बाबांसारखा गायक मी पाहिला नाही. त्यांनी ‘ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा’ या तीन घराण्यांची गायकी समर्थपणे पेलली होती. पं. जगन्नाथबुवा, पं. मिराशीबुवा, पं. वामनराव सडोलीकर, पं. मनोहर बर्वे आणि मास्तर कृष्णाराव हे त्यांचे आराध्य दैवत होते.
१ आ. तालावर प्रभुत्व : वडील लहानपणापासून तबला शिकत असल्यामुळे त्यांचे तालावर प्रचंड प्रभुत्व होते.
१ इ. कै. बाबांचा स्वभाव निगर्वी होता.
पं. राम मराठे यांचा परिचय
पं. राम मराठे यांचा जन्म पुणे येथे झाला. ते नामवंत गायकांपैकी एक होते. त्यांनी ‘ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा घराणे (टीप १)’ या तिन्ही घराण्यांच्या गायकींचे (टीप २) शिक्षण घेतले होते. हे शिक्षण त्यांनी त्या त्या घराण्यांचे मान्यवर कलाकार, पं. मनोहर बर्वे, कै. पंडिता मोगुबाई कुर्डीकर, विलायत हुसेन खाँ यांच्याकडून घेतले होते. शास्त्रीय गायनातील त्यांचे गुरु जगन्नाथबुवा पुरोहित, मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर, मिराशीबुवा, बी.आर्. देवधर इत्यादी होते.
पं. राम मराठे उत्तम गायक तर होतेच, तसेच ते उत्तम नट आणि संगीतकारही होते. त्यांनी ‘संगीत मानापमान, संगीत मृच्छकटीक, तसेच संगीत मंदारमाला’ यांसारख्या अनेक नाटकांमध्ये कामे केली. ‘संगीत मेघमल्हार आणि संगीत मंदारमाला’ या नाटकांमध्ये संगीत देण्याचे कामही त्यांनी केले. ‘संगीतभूषण’ यांसारख्या अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत.
टीप १ – घराणे : ‘घराणी’ म्हणजे विविध संगीतशैलींच्या परंपरांचे जतन करणारी कुटुंबे होत. अशी ४ घराणी सर्वमान्य झालेली आहेत. १. ग्वाल्हेर घराणे, २. किराणा घराणे, ३. जयपूर घराणे आणि ४. आग्रा घराणे
टीप २ : गायकी : घराणेदार गायकीत इतर गुणीजनांचे गायन ऐकून स्वतःच्या आवाज धर्माप्रमाणे (आवाजाच्या गुणधर्माप्रमाणे) विकसित केलेली स्वतंत्र गायनशैली.
१ ई. खाण्याची आवड असलेले आणि मिश्कील स्वभावाचे बाबा ! : बाबांनी कधीही खाण्याची पथ्ये पाळली नाहीत. ते भजी खाऊनसुद्धा गायला बसत असत. एकदा गणपतीच्या काळात बाबांचा सकाळी ‘ब्राह्मण सेवामंडळा’त गायनाचा कार्यक्रम होता. तेव्हा बाबांनी मला भजी आणण्यास सांगितले. मी त्यांना भजी नेऊन दिली. भजी खाण्याच्या संदर्भात बाबा गंमतीत म्हणायचे, ‘‘माझा गायचा गळा वेगळा आणि खायचा गळा वेगळा आहे !’’
पं. संजय मराठे यांचा परिचय
पं. संजय मराठे यांनी वयाच्या तिसर्या वर्षापासून त्यांचे वडील संगीतभूषण (कै.) पं. राम मराठे यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेण्यास आरंभ केला. वडिलांसमवेत ते हार्मोनियमवर (संवादिनीवर) ‘ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा’ या घराण्यांच्या विविध शैलीही वाजवायचे. त्यांनी पं. भीमसेन जोशी, पं. जसराजजी आदी नामवंत कलाकारांना हार्मोनियमची साथ केली. ‘जोड राग’ हे त्यांचे वैशिष्ट्य आहे, ज्यासाठी ते ओळखले जातात. मराठी नाटकाच्या क्षेत्रात ‘मंदारमाला आणि सौभद्र’ अशा नाटकांमध्येही त्यांचे योगदान आहे.
पं. संजय मराठे यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत संशोधन केंद्रा’ला ४ वेळा भेट दिली असून या संशोधनकार्यासाठी ते निःस्वार्थ योगदान देत आहेत.
१ उ. बाबांनी एकाच दिवशी नाटकाचे ३ – ३ प्रयोग करणे, असे साडेतीन सहस्रांहून अधिक प्रयोग आणि सहस्रोहून अधिक गाण्याच्या मैफिली त्यांनी केल्या असणे : बाबा दिवसाला तीन नाटके करत असत. सकाळी ‘सौभद्र’, दुपारी ‘सुवर्णतुला’ आणि रात्री ‘स्वयंवर’ ! ही नाटके अडीच घंट्यांत संपणारी नव्हती. असे त्यांनी ३५०० नाटकांचे प्रयोग केले आणि १००० हून अधिक त्यांनी गाण्याच्या मैफिली (कार्यक्रम) केल्या. मैफिलित ते रात्री १० वाजता गायला बसायचे आणि पहाटे ५ पर्यंत त्यांचे गायन चालू असायचे.
१ ऊ. एखादा कठीण राग कुणी न शिकवताही केवळ ऐकून सहजतेने प्रस्तुत करणारे (कै.) पं. राम मराठे ! : बाबा पुष्कळ हुशार आणि एकपाठी होते. बाबांना २२ नाटके तोंडपाठ होती. बाबांनी एखादी गोष्ट एकदा ऐकली की, लगेच त्यांना ती पाठ होत असे. एकदा पं. जगन्नाथ बुवांकडे गुरुपौर्णिमेनिमित्त सभा होती. बाबा सभेच्या आधी २ दिवस त्यांच्याकडे पोचले. तेव्हा जगन्नाथबुवा पं. जितेंद्र अभिषेकीबुवांना ‘पटमंजिरी’ हा राग शिकवत होते आणि बाबा बाजूला बसून ऐकत होते. शिकवणी संपली. ‘सभेमध्ये कुणी काय गायचे ?’, ते ठरले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व शिष्यांची गाणी झाली. बाबा गाण्यासाठी बसले. बाबांनी ‘भैरव भटियार’ हा राग चालू केला. जगन्नाथबुवा म्हणाले, ‘‘राम, अजून काहीतरी गा.’’ तेव्हा बाबांनी ‘पटमंजिरी’ हा राग चालू केला. तो बाबांनी इतका सुरेख गायला की, पं. जगन्नाथबुवा अवाक् झाले. ते म्हणाले, ‘‘अरे राम, मी तुला हा राग शिकवलेला नाही.’’ तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही परवा अभिषेकीला (पं. जितेंद्र अभिषेकी यांना) हा राग शिकवत होतात ना, तो मी मागे बसून ऐकत होतो.’’
बुवांच्या डोळ्यांमधून अश्रूधारा वाहू लागल्या. ‘पटमंजिरी’ या रागामध्ये पाच रागांचे मिश्रण आहे आणि बाबांनी हा राग त्यांना शिकवलेला नसतांनाही केवळ ऐकून तो प्रस्तुत केला. बाबा असे एकपाठी होते.
(‘रागांचे नियम सांभाळून एकाच रागात पाच रागांचे मिश्रण असलेले गाणे म्हणणे, ही पुष्कळ अवघड गोष्ट आहे; कारण यात त्या त्या रागांचे स्वर चपखल लागायला हवेत. तशी त्या गायकाची हातोटीही असायला हवी. असे राग कुणीही गाऊ शकत नाही आणि एकदा ऐकून तर असे राग गाणे अत्यंत कठीण आहे; परंतु पं. राम मराठे यांनी एकदाच राग ऐकून तो सहजतेने गायला. त्यामुळे त्यांचे गुरु पं. जगन्नाथबुवा यांच्या डोळ्यांत पाणी आले.’ – संकलक)
१ ए. (कै.) पं. राम मराठे उत्तम तबलावादक होते.
१ ऐ. पं. राम मराठे यांच्यामध्ये गायक किंवा वादक यांची शैली आत्मसात करून त्यांच्याप्रमाणे तंतोतंत प्रस्तुत करण्याची उत्तम गुणग्राहकता असणे : बाबा उत्तम नकलाकार होते. ते एखाद्या कलाकाराची तंतोतंत नक्कल करत असत; पण त्यामध्ये कलाकारांची मस्करी नसे, तर त्यांच्या गाण्यांमधील गुणग्राहकता करून किंवा गाण्यातील गाभा समजून घेऊन ते रसिक जनांसमोर सादर करत असत. ते विविध गायक, तसेच अनेक वादक यांचीही तंतोतंत नक्कल करत, म्हणजे त्यांच्या शैलीनुसार गायन आणि वादन करत असत.
याचेच उदाहरण म्हणजे एकदा धारवाड, कर्नाटक येथे बाबांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होता. धारवाड भागातील रसिकजनांवर पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या शास्त्रीय संगीताचा पगडा मोठा होता. त्यामुळे ‘पं. राम मराठे यांच्या गायनाला तेथील लोक कसा प्रतिसाद देतील ?’, असा प्रश्न बर्याच जणांच्या मनात होता. कार्यक्रमाच्या आरंभीच बाबांनी राग गायला चालू केला, तो पं. मन्सूर यांच्या शैलीमध्येच ! त्यांनी संपूर्ण रागाची प्रस्तुती पं. मन्सूर यांच्या शैलीमध्येच केली आणि रसिकांच्या समोर पं. मन्सूर यांना उभे केले. यामुळे पं. मराठे यांनी रसिकांच्या मनाचा ठावच घेतला.
धन्य धन्य ते बाबा ! अशा तीर्थरूप कै. बाबांच्या चरणी माझे शतशः प्रणाम !’
– पं. संजय मराठे (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६२ टक्के (वय ६८ वर्षे), ठाणे (११.११.२०२४)
वडिलांना ‘गुरु’ मानून ‘संगीतसाधना’ करणारे पं. संजय मराठे !
‘हा लेख वाचतांना पं. संजय मराठे यांचा आपल्या वडिलांप्रती असलेला गुरुभाव दिसून येतो. त्यांनी त्यांच्या वडिलांची एकेक गुणवैशिष्ट्ये टिपून ठेवली आहेत. वडिलांना ‘गुरु’ मानून ‘संगीत ही ‘साधना’ म्हणून कशी करावी ?’, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. ‘हे एक उत्तम साधक-कलाकाराचे लक्षण आहे’, असे म्हणता येईल.’
– सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४३ वर्षे), संगीत अभ्यासिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (११.११.२०२४)
दैवी गुणवैशिष्ट्ये असलेले पं. राम मराठे हे संगीत क्षेत्रातील एक दैवी कलाकार होते !
‘चाणाक्ष बुद्धीमत्ता, एकपाठीपणा, शारीरिक कष्ट करण्याची अफाट क्षमता आणि कलेवर प्रभुत्व असणे’, ही सर्व कलेतील दैवी गुणवैशिष्ट्येच म्हणता येतील. ही दैवी गुणवैशिष्ट्ये असलेल्या पं. राम मराठे यांना ‘संगीत क्षेत्रातील एक दैवी कलाकार’, असे म्हणता येईल ! पुर्वपुण्याईनेच कलाकाराला एखादी कला मिळालेली असते. कलेला साधनेची जोड दिल्यास त्या कलाकाराचा कलेच्या माध्यमातून उद्धार होतो. कलेतून साधना झाल्याने त्या कलाकाराच्या मनुष्यजन्माचे सार्थक होते.
(कै.) पं. राम मराठे यांच्यासारख्या दैवी कलाकाराच्या चरणी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने शतशः नमन !’
– सौ. अनघा जोशी (११.११.२०२४)