उद्या आश्विन पौर्णिमा या दिवशी (९.१०.२०२२) या दिवशी) भारतातील जगप्रसिद्ध चित्रकार राजा रवि वर्मा यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…
राजा रवि वर्मा यांचे जन्मस्थान विलिमनूर (त्रावणकोर संस्थान) असून त्यांची जात मल्याळी क्षत्रिय होती. लष्करी पेशातील कामगिरीमुळे त्यांच्या घराण्याला विलिमनूर गाव इनाम मिळाले होते. त्यांचे घराणे अत्यंत सुसंस्कृत असे होते. लहानपणापासून त्रावणकोरच्या महाराजांच्या संगतीत राजा रवि वर्मा असल्यामुळे त्यांच्या चित्रकलेच्या नादाला उत्तेजन मिळत गेले. वर्ष १८७३ मध्ये मद्रास येथील चित्रकलेच्या प्रदर्शनात त्यांच्या एका चित्राला सुवर्णपदक मिळून त्यांची वाहवा झाली. बडोदा, भावनगर, मैसुरू इत्यादी संस्थानिकांशी त्यांचा संबंध येऊ लागला. त्यांनी रामायण आणि महाभारत यांतील चित्रे बडोदा सरकारच्या राजवाड्यात काढली. त्या चित्रांच्या मुद्रणासाठी ‘रवि वर्मा छापखाना’ (प्रेस) काढण्यात आला. आजही भारतातील कानाकोपर्यात त्यांची चित्रे जाऊन पोचली आहेत. त्यांच्या चित्रांची ख्याती सर्व जगात होत असते. हिंदुस्थानच्या प्रत्येक राजवाड्यात आणि अनेक घरांत त्यांची चित्रे असून त्यांनी लोकांचा आदर संपादन केला आहे.
साधेपणा, समानता, व्यवस्थितपणा, पावित्र्य, उज्ज्वलता आदी गुण त्यांच्या चित्रांतून प्रामुख्याने दिसून येतात. रवि वर्मा स्वतः मल्याळी असून त्यांच्या सर्व चित्रांतील व्यक्तींना महाराष्ट्रीय पोशाख असे. त्याविषयी ते ‘चित्रास इतका योग्य पोशाख दुसर्या प्रांतात नाही’, असे म्हणत. त्यांनी काढलेल्या स्त्रियांच्या चित्रांमधील चेहर्यात भावदर्शन उत्कटपणे साधलेले असल्यामुळे ती सर्व चित्रे उत्कृष्ट म्हणूनच गणलेली आहेत. अनेक सूक्ष्म भावना हळूवारपणे चित्रात दर्शित करण्यात त्यांचा हातखंडा असे. मानवी स्वभावाच्या विविध छटा ‘कृष्ण शिष्टाई’ या त्यांच्या विख्यात चित्रात स्पष्टपणे खुलून दिसतात.’
(साभार : ‘दिनविशेष’)