आश्विन शुक्ल द्वादशी (७.१०.२०२२) या दिवशी माझे यजमान श्री. संदीप शिंदे यांचा ४० वा वाढदिवस आहे. ते सनातनच्या रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करतात. माझा आणि श्री. संदीप यांचा विवाह होऊन दीड वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. संदीप शिंदे यांना ४० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. प्रेमभाव
‘माझे यजमान श्री. संदीप यांच्यामध्ये प्रेमभाव असल्याने ते कुणालाही साहाय्य करण्यास तत्पर असतात.
२. पत्नीला सकारात्मक होण्यासाठी साहाय्य करणे
२ अ. पत्नीला संतांच्या सहवासाचे महत्त्व सांगणे : काही वेळा चुकांची भीती किंवा आध्यात्मिक त्रास यांमुळे संतांकडे जाण्यासाठी माझा संघर्ष होत असे. त्या वेळी यजमान मला संतांच्या सहवासाचे महत्त्व सांगून ‘त्यांनी माझ्यासाठी आतापर्यंत काय केले आहे’, याविषयी सांगून माझे मन वळवून मला पुन्हा संतांकडे पाठवतात.
२ आ. संतांनी उद्गारलेली वाक्ये आणि शब्द यांची आठवण करून देऊन नकारात्मक स्थितीतून बाहेर पडण्यास साहाय्य करणे : काही वेळा माझ्या मनाची स्थिती नकारात्मक असतांना ते मला संतांनी माझ्याविषयी पूर्वी काही कौतुक केले असेल, तर ती वाक्ये आणि शब्द यांची मला आठवण करून देतात. ‘संतांचा माझ्यावर किती विश्वास आहे’, हे सांगून मला माझ्या स्थितीतून बाहेर काढण्याचा यशस्वी प्रयत्न करतात.
३. सर्वांशी मिळून मिसळून वागणे
यजमान कुठेही गेले, तरी ते सहज सर्वांमध्ये मिसळून रहातात. प्रत्येक परिस्थिती आणि व्यक्ती यांच्याशी ते सहजपणे जुळवून घेतात. एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ त्यांच्याविषयी म्हणाल्या, ‘‘संदीप कुठेही गेला, तरी त्याला कोणत्याही विषयांची किंवा बोलण्याची अडचण नसते. तो कोणत्याही विषयावर बोलून सर्वांमध्ये सहज मिसळतो. ‘सर्वांनाच ते जमते’, असे नाही.’’
४. तत्त्वनिष्ठ असणे
काही वेळा मी माझ्याकडून झालेल्या चुका किंवा अयोग्य विचारप्रक्रिया यजमानांना सांगते. तेव्हा ते तत्त्वनिष्ठपणे मला माझ्या दृष्टीने जे आवश्यक आहे, ते सांगतात; परंतु ते स्वीकारण्याचा मला आग्रह करत नाहीत.
५. गुरूंना अपेक्षित अशी सेवा होण्यासाठी प्रयत्नशील असणे
आम्ही करत असलेल्या सेवेत यजमानांना त्यामध्ये आणखीन काही चांगले पालट किंवा काही त्रुटी लक्षात आल्यास ते आवर्जून स्वतःहून सांगतात. ‘ते कोणत्याही सूत्राचा अभ्यास सांगतांना त्यातून होणारा लाभ, हानी किंवा काय काळजी घ्यावी लागेल’, याविषयी सविस्तर समजावून सांगतात.
६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी योग्य वेळी साधनेत आणल्याविषयी कृतज्ञता वाटणे
त्यांचे बरेचसे मित्र मोठ्या पदावर नोकरी करून विदेशात गेले आहेत. ‘यजमान या सगळ्या गोष्टीत अडकले नाहीत. ‘त्यांना गुरुदेवांनी योग्य वेळी साधनेत आणले’, याविषयी कृतज्ञता वाटते.
७. यजमान सनातन संस्थेशी जोडले गेल्याने मनावर योग्य संस्कार होणे
ते वसतीगृहामध्ये (हॉस्टेलमध्ये) असतांना अनेक मुलांना व्यसने आणि अयोग्य सवयी होत्या; पण त्याच काळात यजमान सनातन संस्थेशी जोडले गेल्याने या सर्व गोष्टींपासून देवानेच ‘त्यांना वेगळे ठेवले’, असे त्यांना वाटते. त्या काळात ते सत्संगांना जायचे; म्हणून इतर मुले त्यांना पुष्कळ चिडवायची; परंतु त्याचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही.
८. समष्टी सेवेची तळमळ असणे
यजमान त्यांचे जुने परिचित किंवा मित्र यांच्या संपर्कात राहून राष्ट्र-धर्म आणि साधना याविषयीची माहिती प्रत्येकाची प्रकृती आणि आवड यांनुसार सांगण्याचा प्रयत्न करतात. ‘गुरुदेवांचे कार्य त्यांच्यापर्यंत पोचावे’, अशी त्यांची तळमळ असते.
९. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
अ. ते आश्रमातून निवासस्थानी जाता-येता गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) जयघोष करतच प्रवास करतात.
आ. व्यवहारातही काही विकत घ्यायचे असल्यास त्यात ‘कुठेही गुरुधनाचा अपव्यय होऊ नये’, असा त्यांचा भाव असतो.
गुरुदेवांच्या कृपेनेच यजमानांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये त्यांच्या चरणी अर्पण करते. ‘त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होऊन त्यांची जलद आध्यात्मिक उन्नती होऊ दे’, अशी श्रीगुरूंच्या चरणी प्रार्थना करते.’
– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.९.२०२२)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |