सोलापूर, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – महानगरपालिका ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या अंतर्गत ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील तलावाच्या ठिकाणी ‘लाईट अँड साऊंड शो’ हा उपक्रम राबवत आहे. या लाईट अँड साऊंड शो उपक्रमात ‘म्युझिकल फाउंटन ऑन वॉटर स्क्रीन’, ‘लेझर थीम आणि लाईट शो’ बसवण्यात आला आहे. ‘ऑडिओ आणि व्हिडिओ ट्रॅक’मध्ये असलेल्या या कार्यक्रमाचा कालावधी ३० मिनिटे इतका आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोलापूर शहराचा इतिहास, स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे चरित्र, तसेच त्यांनी केलेल्या समाजोपयोगी कार्याची माहिती, शहरातील मुसलमान समाजाचे श्रद्धास्थान असलेले हाजी शहाजूर वली यांचे चरित्र यांचा समावेश असलेला माहितीपट मराठी, कन्नड आणि हिंदी या ३ भाषांतून नागरिकांना दाखवण्यात येत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यटकांच्या संख्येतही वाढ होण्यास साहाय्य होईल, असे त्यांनी सांगितले.