‘हर घर भगवा’ मोहिमेत सहभाग घेऊन हिंदु राष्ट्रासाठी सीमोल्लंघन करा !

हिंदु जनजागृती समितीचे हिंदूंना आवाहन

३ ते ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीतील देशव्यापी ‘हर घर भगवा’ अभियानाला प्रारंभ !

मुंबई – हिंदु जनजागृती समितीच्या २० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने देशभरात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ साजरा केला जात आहे. या अभियानांतर्गन विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज बुलंद करण्यासाठी समितीने ३ ते ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ‘हर घर भगवा’ या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ केला आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेत राष्ट्रप्रेमी नागरिकांनी घरांवर तिरंगा फडकवून देशप्रेम व्यक्त केले. याचप्रकारे आता ‘हर घर भगवा’ मोहिमेत सहभागी होऊन हिंदु राष्ट्र प्रेम व्यक्त करावे आणि हिंदु राष्ट्रासाठी सीमोल्लंघन करून विजयादशमी साजरी करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

तसेच ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’अंतर्गत आतापर्यंत ३३ सहस्र ६०० जणांनी हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेतली असून या अभियानात हिंदु राष्ट्रावर आधारित ३ सहस्र व्याख्याने, ३ सहस्र फलकप्रसिद्धी, १ सहस्र मंदिरांची आणि २५० ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, ३५० महिला संघटन उपक्रम, २०० महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम, ३० ‘हिंदु राष्ट्र संघटन मेळावे’, ५० ‘वर्धापनदिन सोहळे’, ५० ‘हिंदु राष्ट्र परिसंवाद’, ७० पथनाट्ये, २०० संघटन बैठका, ६० अधिवक्ता बैठका आदींचे देशभरात आयोजन करण्यात आले आहे.

‘हर घर भगवा’ मोहिमेत कसे सहभागी व्हाल ?


‘हर घर भगवा’ या मोहिमेत सहभागी होण्यासाठी भगवा ध्वज स्वतःच्या घरावर लावून त्यासोबत ‘सेल्फी’ (स्वतःच काढलेले स्वतःचे छायाचित्र) काढावा आणि तो ‘फेसबूक’, ‘ट्विटर’, ‘इन्स्टाग्राम’ आदी सामाजिक संकेतस्थळांवर प्रसारित करावा. छायाचित्र पोस्ट करतांना #HarGharBhagwa हा हॅशटॅग वापरावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे. तसेच छायाचित्र पोस्ट करतांना ते हिंदु जनजागृती समितीच्या सामाजिक माध्यमाच्या खात्यालाही ‘टॅग’ (उद्देशून) करावेत, असे समितीने कळवले आहे. या अभियानासाठी समितीने HinduRashtra.HinduJagruti.org हे स्वतंत्र ‘पेज’ चालू केले असून या पेजवर हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध होण्याविषयी प्रतिज्ञा देण्यात आली आहे. आतापर्यंत  ही प्रतिज्ञा घेणार्‍यांना, तसेच ‘हर घर भगवा’ या अभियानात सहभागी होणार्‍यांना समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र वीर’ प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी वरील ‘पेज’वर जाऊन ‘फॉर्म’ भरावा, असे समितीने म्हटले आहे.

‘हर घर भगवा’ मोहिमेविषयी मान्यवरांच्या प्रतिक्रिया !

१. ‘हर घर भगवा’ मोहिमेमुळे हिंदूऐक्याचे दर्शन घडेल ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन

हिंदु जनजागृती समिती यंदाच्या वर्षी संघर्षाची २० वर्षे पूर्ण करत आहे. त्यानिमित्ताने आपण सर्वांनी निर्णय घेतला आहे की, ३, ४ आणि ५ ऑक्टोबरला, म्हणजे अष्टमी, नवमी आणि दशमीला प्रत्येक हिंदू स्वतःच्या घरावर मोठ्या अभिनानाने भगवा ध्वज फडकवेल. यामुळे हिंदूऐक्याचे दर्शन घडेल आणि ‘हिंदू संघटित आहेत’, हे सर्वांच्या लक्षात येईल.

२. हिंदूंनी घरावर भगवा ध्वज फडकवून विजयदशमीचा उत्सव साजरा करावा ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन
देशभरातील सर्व धर्माभिमानी हिंदूंनी ३, ४ आणि ५ ऑक्टोबरला स्वतःच्या घरावर भगवा ध्वज फडकवून विजयदशमीचा उत्सव साजरा करावा. आपण सर्वांनी आपल्या घरांवर भगवा ध्वज फडकवला, तर विजयदशमीच्या या पवित्र शुभमुहुर्तावर हिदु एकता, हिंदु अस्मिता आणि हिंदूऐक्य यांचे दर्शन घडेल, असे निवेदन अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले.