हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची आज समाजाला आवश्यकता ! – भूषण पोळ,  विश्वस्त, श्री मांगल्येश्वरीदेवी मंदिर

पुणे येथे ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’च्या अंतर्गत नवरात्रीच्या निमित्ताने विविध ५ विषयांवर व्याख्यान

पुणे – हिंदू संघटित आणि जागृत होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत ठिकठिकाणी चालू असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. तुमची आज समाजाला आणि आम्हाला आवश्यकता आहे. असे विषय अनेक ठिकाणी व्हावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करू. नवरात्रोत्सवाचा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू, असे श्री मांगल्येश्वरीदेवी मंदिराचे विश्वस्त श्री. भूषण पोळ यांनी सांगितले. येथील सत्यविजय मंडळ आणि श्री मांगल्येश्वरीदेवी मंदिर यांनी ‘नवरात्रीचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व’, ‘देवीपूजनातील काही कृतींचे शास्त्र’ अन् ‘शौर्यजागृतीची आवश्यकता’, या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन मंदिराचे विश्वस्त सर्वश्री आशिष सस्ते आणि भूषण पोळ यांनी केले होते.

श्री मांगल्येश्वरीदेवी मंदिराबाहेर लावण्यात आलेले धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स
हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्राची शिंत्रे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना
हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना

या विषयांवर समितीच्या कु. प्राची शिंत्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी ‘मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी पालकांची भूमिका’ आणि ‘धर्मशास्त्र जाणून घेण्याचे महत्त्व’, या विषयांवर मार्गदर्शन केले. या सर्व व्याख्यानांचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

वैशिष्ट्यपूर्ण

१. मंडळाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या कार्यक्रमाची वेगळी ‘पोस्ट’ (लिखाण) सिद्ध करून या कार्यक्रमाचा सामाजिक माध्यमांवर प्रसार केला होता.

२. ‘असे कार्यक्रम आणि समितीचे विविध उपक्रम तुम्ही या मंदिरात कधीही राबवू शकता. प्रतिदिन जरी तुम्हाला एखाद्या उपक्रमासाठी जागा लागली, तरी तुम्ही या मंदिराचा उपयोग करू शकता’, असे मंडळाने सांगितले.

३. या वेळी आयोजकांनी सांगितले, ‘‘आठवड्यातून एक दिवस तुमच्या माध्यमातून धर्मकार्यात सहभागी होऊ.’’