पुणे – माणसे गरीब असतात; कारण त्यांच्याकडे लक्ष्मी नसते. गरिबांना विद्येचा, कलेचा म्हणजेच श्री सरस्वतीचा आधार असतो. श्री सरस्वतीदेवीचा अवमान हा देशाचा अवमान आहे, असे म्हटल्यास चूक ठरणार नाही. सध्याच्या राजकारण्यांना श्री सरस्वती नको, तर श्री लक्ष्मी हवी आहे, असे स्पष्ट प्रतिपादन कादंबरीकार विश्वास पाटील यांनी केले. अभिनेता प्रसाद ओक लिखित आणि ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’द्वारा प्रकाशित ‘माझा आनंद’ या पुस्तकाचे प्रकाशन विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी श्री सरस्वतीदेवीच्या संदर्भात टीका केली होती. त्याचा समाचार घेत विश्वास पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. ते पुढे म्हणाले, ‘‘आपली संस्कृती हिमालयासारखी आहे. आपल्याकडे शाळेत प्रथम श्री सरस्वतीदेवीच्या पूजनाची पद्धत आहे. सावित्रीबाई फुले यांनीही श्री सरस्वतीदेवीची उपासना केली होती. त्यांच्या शाळेत प्रतिदिन श्री सरस्वतीदेवीचे पूजन होत असे. त्या वेळी महात्मा फुलेही तेथे असायचे; मात्र आज राजकारण्यांची बौद्धिक पातळी घसरली आहे.’’