हिंदु राष्‍ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा घटनात्‍मक अधिकार आहे ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

यवतमाळ येथे हिंदूसंघटन मेळावा

‘हलाल जिहाद’ ग्रंथाचे प्रकाशन करतांना डावीकडून श्री. मंगेश खान्देल, श्री. सूरज गुप्ता आणि श्री. सुनील घनवट

यवतमाळ, १ ऑक्टोबर (वार्ता.) – जगात अन्य धर्मियांची बरीच राष्ट्रे आहेत; पण भारत धर्मनिरपेक्ष देश असल्‍याने जगात हिंदूंचे एकही हिंदु राष्‍ट्र नाही. हिंदूंना सुरक्षित वाटेल अशा हिंदु राष्‍ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा घटनात्‍मक अधिकार आहे. हिंदु राष्‍ट्र हे प्रभु श्रीरामाचे रामराज्‍य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्‍वराज्‍य यांप्रमाणे असेल. त्‍यामुळे तेथे कुणावरही अन्‍याय होणार नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ते समितीच्‍या द्विदशकपूर्तीनिमित्त येथे झालेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात बोलत होते. या वेळी त्यांनी देशविरोधी असलेल्या हलाल अर्थव्यवस्थेचे तोटे सांगितले.

या वेळी मान्यवरांच्या हस्ते समितीच्या ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले. या मेळाव्याला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महिला उत्थान मंडळ, निःस्वार्थ सेवा फाउंडेशन, स्वामी विवेकानंद केंद्र, आर्य समाज, स्वदेशी समूह, पतंजली योग समिती, सनातन संस्था इत्यादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा लाभ १४० धर्मप्रेमींनी घेतला.

हिंदु संस्कृतीचे रक्षण करणे, हे हिंदूंचे दायित्व असल्याने धार्मिकदृष्ट्या जागृत रहा ! – सूरज गुप्ता, जिल्हा सचिव, भाजप

सामाजिक माध्यमातून हिंदु संस्कृतीवर टीका-टिप्पणी, तसेच विडंबन केले जाते. हिंदूंनी जागृत राहून हिंदु संस्कृतीच्या विरोधात बोलणार्‍यांना संवैधानिक मार्गाने विरोध करणे, हे आपले कर्तव्य आहे. हिंदु संस्कृतीचे रक्षण करणे, हे आपल्या सर्वांचे दायित्व आहे. आपण धार्मिकरित्या जागृत असले पाहिजे. तसे झाल्यासच हिंदु संस्कृतीची होणारी हानी टाळली जाऊ शकते; कारण जेव्हा जेव्हा हिंदू जागृत झाला, तेव्हा तेव्हा इतिहास घडला आहे. सामाजिक माध्यमातून हिंदु धर्माचा प्रसार करून खारीचा वाटा उचलावा !