गोव्यातील खाण लिजांचे ४ खाणपट्टे लिलावात

(लीज म्हणजे सरकारी भूमी काही वर्षांसाठी वापरण्यास देण्याचा करार)

पणजी – साडेचार वर्षांनंतर राज्यशासनाने खाण लिजांचे ४ खाणपट्टे लिलावात काढले आहेत. यामध्ये उत्तर गोव्यातील डिचोली, मये आणि शिरगाव, तर दक्षिण गोव्यातील काले, अशा खाणपट्ट्यांचा समावेश आहे. बंद पडलेला खाण व्यवसाय पुन्हा चालू करण्याच्या दृष्टीने सरकारने हे पाऊल उचलले आहे. यासंदर्भातील निविदा सूचनाही सरकारने काढल्या आहेत. निविदा अर्ज खरेदी करण्याचा अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर, तर निविदा सादर करण्याचा अंतिम दिनांक २१ नोव्हेंबर आहे.

प्राप्त माहितीनुसार, सरकारने लिलावांसाठी एकूण ८ खाणपट्टे निश्चित केले आहेत. त्यांतील पहिल्या टप्प्यातील ४ खाणपट्ट्यांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्प्याने पुढील खाणपट्टे लिलावासाठी काढण्यात येणार आहेत. केंद्रशासनाचे ‘एम्.एस्.टी.सी.’ हे ‘ई-कॉमर्स’ आस्थापन लिलाव प्रक्रिया करत आहे.

याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, मोठे खाणपट्टे प्रथम लिलावात काढण्यात आले असून यामुळे खाण व्यवसाय जोमाने चालू होईल. राज्यातील खाण व्यवसाय चालू होण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे.