गोवा पोलिसांकडून मानवी तस्करीचे आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त

बेकायदेशीर नोकरभरती संस्था चालवणारे सय्यद अब्दुला शेख आणि मस्तान खान पोलिसांच्या कह्यात

पणजी, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – गोवा पोलिसांनी बेकायदेशीर नोकरभरती संस्था चालवून त्या माध्यमातून भारतातून मस्कत येथे युवतींची तस्करी करणारे आंतरराष्ट्रीय जाळे गोवा पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणी बेकायदेशीर नोकरभरती संस्था चालवणारे सय्यद अब्दुल्ला शेख आणि मस्तान खान यांना कह्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक (गुन्हे विभाग) राहुल गुप्ता यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. मस्कत येथून एक पीडित युवतीने पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलीस अधीक्षक (गुन्हे विभाग) राहुल गुप्ता म्हणाले, ‘‘मस्कत येथून परतलेल्या युवतीने पोलिसांना तिची फसवणूक झाल्याचे सांगितले. त्या ठिकाणी कामवालीचे काम देण्याचे सांगून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि तिला उपाशी ठेवण्यात आले. युवतीने दिलेल्या माहितीनुसार मस्कत येथे अजूनही भारतभरातील ११ युवती फसलेल्या आहेत. देशातील विविध भागांमध्ये विदेशी नोकरभरती संस्थांच्या माध्यमातून युवतींना मस्कत येथे पाठवण्यात आले होते.’’

गोव्यातील सर्व भरती संस्थांची गृह विभागाकडून तपासणी

पणजी – गोवा सरकारच्या गृह विभागाने राज्यात मानव तस्करीच्या प्रकरणांमुळे गोव्यातील सर्व भरती संस्थांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी लोकांना आंतरराष्ट्रीय नोकर्‍यांच्या नावावर फसवणूक किंवा शोषण झाल्यास तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे. गोव्यातील १२ परराष्ट्र मंत्रालय नोंदणीकृत संस्था पुढीलप्रमाणे आहेत – आर्.बी. कन्सल्टन्स, मुईबीन एअर ट्रॅव्हल्स, अमन ट्रॅव्हल सर्व्हिस, अस्मॅक्स, एम्.आय. इंटरनॅशनल ट्रॅव्हल एजन्सी, एन्.डी. ग्लोबल सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, टॅलेंट हंट कन्सल्टन्सी, ओशन ट्रॅव्हल्स, पिरॅमिड ट्रॅव्हल्स, नोव्हालाईफ कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड, जॉबसाइट ओव्हरसिज कन्सल्टन्स आणि स्टारलाईट इंटरनॅशनल रिक्रूटर प्रायव्हेट लिमिटेड.