काणकोण, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – पैंगीण येथील श्री. दत्तानुभव (राघव) गुलाब टेंग्से यांनी तेनाली येथे शृंगेरी मठाचे शंकराचार्य आणि अन्य वेदांतशास्त्र पंडित यांनी घेतलेल्या वेदांतशास्त्र (१९ धर्मग्रंथांवरील) महापरीक्षेत उत्तीर्ण होण्याबरोबरच देशात पहिले येण्याचा मान मिळवून पैंगीण ग्रामासह भारतीय संस्कृतीचा मुकुटमणी होण्याचा मान मिळवला. १६ नोव्हेंबर या दिवशी ते त्यांच्या गावी पैंगीणला पोचताच त्यांचे सुवासिनींकरवी औक्षण करून स्वागत करण्यात आले आणि येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी व्यासपिठावर पैंगीणचे ज्येष्ठ पुरोहित श्री. रामचंद्र टेंग्से, श्री. परशुराम देवस्थानचे अध्यक्ष श्री. उदय प्रभुगावकर, पुरोहित ह.भ.प. श्री. निशिकांत टेंग्से, सत्कारमूर्ती श्री. दत्तानुभव यांचे ज्येष्ठ बंधू श्री. भार्गव टेंग्से, वडील श्री. गुलाब टेंग्से, आई सौ. शुभा टेंग्से, श्री. चिन्मय आमशेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पैंगीण येथे सत्कारमूर्ती श्री. दत्तानुभव टेंग्से यांचे आगमन होताच ‘अद्वैत वेदांतरत्न श्री. दत्तानुभव टेंग्से यांचा विजय असो’, ‘सनातन धर्माचा विजय असो’, ‘जयतु संस्कृतं, जयतु भारतम्’, ‘जयतु जयतु हिंदु राष्ट्रम्’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ‘श्रीराम जयराम जय जय राम’, असा नामजप उपस्थित सर्व हितचिंतकांनी चालू केला. एक आगळावेगळा सोहळा सर्वांनी अनुभवला. प्रारंभी संस्कृत शिक्षक श्री. चिन्मय आमशेकर यांनी प्रास्ताविकातून सत्कारमूर्ती श्री. दत्तानुभव (राघव) यांच्या शालेय शिक्षणापासून अद्वैत वेदांतरत्न पदवीपर्यंतच्या प्रवासाचे वर्णन केले.
श्री. रामचंद्र टेंग्से यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन श्री. श्री. दत्तानुभव (राघव) टेंग्से यांचा सत्कार करण्यात आला. श्री. भार्गव टेंग्से यांनी आदिभौतिक आणि आदिदैविक ज्ञान, द्वैत अन् अद्वैत, संस्कृत भाषा आणि प्राकृत भाषा अन् आध्यात्मिक ज्ञान यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती देतांना आज येथे एका समाजपुरुषाचा सन्मान आम्हा सर्व समाजपुरुषांकडून झालेला आहे, असे म्हणत सर्वांचे आभार मानले.
श्री. प्रसाद पागी यांनी सूत्रसंचालनातून श्री. दत्तानुभव यांचा संपूर्ण शैक्षणिक कालखंड उपस्थितांसमोर मांडला.
वेदशास्त्रसंपन्न श्री. दत्तानुभव टेंग्से यांच्यासम समाजपुरुषांकडून सनातन संस्कृती गाडून टाकण्याचा प्रयत्न हाणून पाडला जात आहे ! – निशिकांत टेंग्से
या वेळी ह.भ.प. श्री. निशिकांत टेंग्से म्हणाले, ‘‘आजची शिक्षणपद्धत ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेली पारतंत्र्याचीच शिक्षणप्रणाली आहे. सनातन संस्कृती गाडून टाकण्याचे, भारतीय संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न सध्या चालू आहेत. गृहसंस्कृतीवर आघात करू पहाणार्यांना वेदशास्त्रसंपन्न श्री. दत्तानुभव (राघव) गुलाब टेंग्से यांच्यासारख्या समाजपुरुषांनी सनातन धर्माची विजय पताका फडकवून फार मोठी क्रांती घडवलेली आहे. सनातन संस्कृती गाडून टाकण्याचा चालू असलेला डाव श्री. दत्तानुभव (राघव) आणि श्री. भार्गव यांनी हाणून पाडला आहे. संपूर्ण विश्वाला व्यापून टाकणारे ज्ञान संपादन करून या समाजपुरुषांनी कुलाला पवित्र केले आहे. असे विद्वान सिद्ध होत आहेत, जगाचे स्वामीत्व आणि गतवैभव या देशाला पुन्हा प्राप्त होण्याची ही नांदी आहे.’’