(म्हणे) ‘देशविरोधी काम करणार्‍या हिंदु संघटनांवर बंदी का नाही ?’ – आमदार अबू आझमी, समाजवादी पक्ष

अबू आझमी

मुंबई – कोणतीही संघटना आतंकवादी असेल आणि सरकारकडे पूर्ण पुरावे असतील, तर अशा संघटनेवर बंदी घातली पाहिजे. संघटना मुसलमान, हिंदु किंवा कोणत्याही जातीधर्माची असो, सर्वांवर समान कारवाई झाली पाहिजे. मग देशविरोधी काम करणार्‍या हिंदु संघटनांवर बंदी का घालण्यात आली नाही ? असा प्रश्‍न समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी केला. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वरील बंदीविषयी अबू आझमी यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

आझमी पुढे म्हणाले, ‘‘आपल्या देशातील कायदा सर्वांसाठी समान आहे. धर्माच्या आधारावर कायद्यात गरीब-श्रीमंत, तसेच लहान-मोठा असा भेदभाव नाही. या देशात रहणार्‍या कोणत्याही व्यक्तीने देशाविरुद्ध काम केले, तर त्याला कारागृहात टाकावे किंवा फाशीची शिक्षा द्यावी; मात्र कायद्याची कार्यवाही करतांना कोणत्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये. नांदेडमध्ये यशवंत शिंदे याने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले, ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असतांना जम्मू-काश्मीर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक बाँब बनवण्याचे आणि बाँबस्फोट करण्याचे प्रशिक्षण देतात. लोकांचे रक्त सांडले जाते आणि या कामात जीव जातो, तेव्हा मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडला.’’ (कायदा सर्वांना समान आहे; म्हणून काय मुसलमानांनी देशद्रोही कृत्ये केल्यावर हिंदु संघटनांवरही कारवाई करायची का ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशद्रोही ठरवण्यापूर्वी आतापर्यंत मुसलमानांच्या शेकडो आतंकवादी कारवाया उघड झाल्या असतांना अबू आझमी कधी त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी का केली नाही ? – संपादक)

(म्हणे) ‘२० लाख लोकांना मारण्याची धर्मसंसदेत शपथ घेण्यात आली !’

काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओमध्ये काही लोक हात वर करून शपथ घेत होते की, ते मुसलमान समाजातील २० लाख लोकांना मारतील. धर्मसंसदेच्या नावाने ही शपथ घेण्यात आली. भाजपशी संबंधित असलेल्या ध्रुव सक्सेना नावाच्या व्यक्तीला सैन्याशी संबंधित माहिती ‘आय्.एस्.आय्.’ला पाठवल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. (अशा प्रकारे खोटी माहिती देऊन समाजातील सलोखा बिघडवणार्‍या अबू आझमी यांच्यावर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)

संपादकीय भूमिका

‘केवळ धर्मबांधव आहेत’ म्हणून मुसलमानांच्या देशद्रोही कृत्याकडे अबू आझमी दुर्लक्ष करत असतील, तर प्रथम त्यांचेच अन्वेषण करायला हवे !