अलिबाग – पिंडदान करणे हा हिंदु संस्कृतीचा भाग असून रायगडावर वीरगती प्राप्त झालेल्या योद्ध्यांसाठी तर्पण करण्यात काही चुकीचे नाही, असे मत कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी व्यक्त केले आहे. शिवप्रेमी राम धुरी यांनी रायगडावर तर्पण करण्याला संभाजी ब्रिगेड संघटनेने आक्षेप घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर आंग्रे यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.
१. रघुजीराजे आंग्रे म्हणाले, ‘‘राम धुरी आणि त्यांचे सहकारी यांनी शिवाजी महाराज यांच्याविषयी असलेल्या निष्ठेवर संशय घेणे अत्यंत चुकीचे आहे. गडासाठी आणि गडावरील लोकांसाठी त्यांनी केलेले काम विसरता येणार नाही. धुरी यांनी स्वतःच्या पूर्वजांचे गडावर तर्पण केले नाही, तर वीरगती प्राप्त झालेल्या योद्ध्यांसाठी तर्पण केले. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. त्यात काहीच चुकीचे नाही. राम धुरी आणि त्यांचे सहकारी वर्ष २००८ पासून हा विधी करत आहेत. रायगडाचे रक्षण करतांना शस्त्राने घायाळ होऊन वीरमरण आलेल्या आणि हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणार्या मावळ्यांचे स्मरण म्हणून हा पिंडदान विधी केला जातो. यावर संभाजी ब्रिगेडकडून घेतला जाणारा आक्षेप दुर्दैवी आहे.’’
२. राम धुरी म्हणाले, ‘‘पितृपक्षात पितरांची आठवण म्हणून घरोघरी श्राद्ध घातले जाते. हा कर्मकांडाचा भाग म्हणून नाही, तर पितरांप्रती आदर व्यक्त करण्याचा भाग असतो. त्याचप्रमाणे वीरगती प्राप्त झालेल्या पूर्वजांची आठवण करण्यासाठी रायगडावर आम्ही धार्मिक विधी केले. त्यात चुकीचे काय ? किमान आरोप करणार्यांनी त्यामागची भूमिका समजून घ्यायला हवी होती.’’