संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत १५६ जणांना भगर खाल्ल्याने विषबाधा !

८ किराणा दुकानदारांवर गुन्हे नोंद !

संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत १५६ जणांना भगर खाल्ल्याने विषबाधा

संभाजीनगर – जिल्ह्यातील वैजापूर, कन्नड आणि बीड जिल्ह्यांतील गेवराई तालुक्यात भगर खाल्ल्याने १५६ जणांना विषबाधा झाली आहे. २६ सप्टेंबरच्या रात्री हा प्रकार घडला होता. वैजापूर तालुक्यात विषबाधा झालेल्यांची संख्या ११८, कन्नडमध्ये १२, तर गेवराई तालुक्यातील २६ जणांवर उपचार चालू आहेत. या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी वैजापूर शहरातील ‘सबका मालिक एक’ या दुकानाचे मालक रमेश गोरक आणि घायगाव अन् लोणी बु. येथील एकूण ८ किराणा दुकानदारांवर गुन्हे नोंद केले आहेत.

अन्न आणि औषध प्रशासनाने वैजापूर येथील ‘सिद्ध अलंकार ट्रेडर्स’वर कारवाई करत १३ सहस्र १२० रुपयांची ८२ किलो निकृष्ट भगर जप्त केली. वैजापूर येथे रुग्णालयांत रुग्णांवर उपचार चालू आहेत. गुन्हे नोंद असलेल्या दुकानदारांनी स्वतःच्या दुकानात असलेले भगर आणि त्याचे पीठ यांचा दर्जा चांगला नसल्याचे ठाऊक असतांनाही ग्राहकांना ते विकले.

संपादकीय भूमिका

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या आणि त्यांना अप्रत्यक्षरित्या फसवणार्‍या या दुकानदारांचे परवाने रहित करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी ! विषबाधेमुळे रुग्णालयात भरती असणार्‍या रुग्णांच्या उपचारांचा सर्व खर्च याच दुकानदारांकडून वसूल करून घेतल्यासच त्यांना धडा मिळेल !