(म्हणे) ‘रा.स्व. संघावरही बंदी घाला !’ – काँग्रेससह विरोधी पक्षांची मागणी

नवी देहली – ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी घातल्यानंतर आता विरोधी पक्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घालण्याची मागणी करण्यास चालू केले आहे.

१. केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री रमेश चेन्निथला म्हणाले की, केरळमधील बहुसंख्य आणि अल्पसंख्य यांच्याकडून केला जाणारा जातीयवाद आणि धर्मांधता यांचा समान विरोध व्हायला हवा. पी.एफ्.आय.प्रमाणेच रा.स्व. संघानेही धार्मिक द्वेष भडकावण्याचे काम केले आहे. त्याने समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस हा असा पक्ष आहे, ज्याने या दोन्ही समाजाकडून पसरवण्यात येणार्‍या जातीवाद आणि सांप्रदायिकता यांना विरोध केलेला आहे.

२. केरळमधील इंडियन युनियन मुस्लिम लीग यांनी पी.एफ्.आय.वरील कारवाईचे स्वागत केले आहे; मात्र रा.स्व. संघावरही बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. या संघटनेचे नेते नेते एम्.के. मुनीर यांनी म्हटले की, पी.एफ्.आय.ने तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी समाजात दुफळी निर्माण करण्याचा, तसेच द्वेष पसवरण्याचे काम केले. सर्वच इस्लामी संघटना आतंकवादी विचारांचा निषेध करतात. पी.एफ्.आय.सारख्या संघटनेने छोट्या मुलांनाही आक्षेपार्ह घोषणा लगावण्यास परावृत्त केले.

संपादकीय भूमिका

रा.स्व. संघाने असे कोणते देशविघातक कृत्य केले ज्यामुळे त्याच्यावर बंदी घातली पाहिजे, हे विरोधी पक्षांनी सांगितले पाहिजे. काँग्रेसने वर्ष १९४८ मध्ये गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात ब्राह्मणांच्या हत्या केल्या, वर्ष १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देहलीमध्येच साडेतीन सहस्र शिखांच्या हत्या केल्या आणि त्याचे राजीव गांधी यांनी अप्रत्यक्ष समर्थन केले, यामुळे काँग्रेसवरच बंदी का घालण्यात येऊ नये ?