भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाककडे उपस्थित केले सूत्र

  • पाकमधील शीख महिलेचे अपहरण आणि धर्मांतर केल्याचे प्रकरण

  • राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने केली होती विनंती !

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकमधील एका शीख महिलेचे धर्मांतर केल्याचे सूत्र भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी पाककडे उपस्थित केले होते, अशी माहिती राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने दिली. स्वतः जयशंकर यांनी आयोगाला याविषयी माहिती दिली होती, तसेच ‘मला आशा आहे की, पाकिस्तान संबंधित उत्तरदायींवर कारवाई करील’, असेही सांगितले होते.

आयोगाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, पाकच्या खैबर पख्तूनख्वा क्षेत्रामध्ये एका शीख महिलेचे अपहरण आणि बलपूर्वक धर्मांतर करण्याची घटना प्रसारमाध्यमांकडून समजल्यानंतर याची नोंद घेण्यात आली होती. याविषयी आयोगाचे प्रमुख इकबाल सिंह लालपुरा यांनी २२ ऑगस्ट या दिवशी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना पत्र लिहून पाककडे याविषयी प्रश्‍न उपस्थित करण्याची विनंती केली होती. जेणेकरून पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये आणि पाकमधील शिखांचे रक्षण करण्यासाठी योग्य पावले उचलली जातील.

याविषयी जयशंकर यांनी १७ सप्टेंबरला आयोगाला पत्र पाठवून सांगितले की, तुम्ही पाठवलेल्या विषयाची नोंद घेऊन पाककडे हे सूत्र उपस्थित करण्यात आले होते, तसेच याविषयी चिंताही व्यक्त केली होती.

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तानमध्ये केवळ शीख नव्हे, तर हिंदूही रहातात आणि त्यांच्यावरही प्रतिदिन अत्याचार होत आहेत, याविषयी राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग आवाज उठवण्यास सांगतो का ?
  • भारत सरकार स्वतःहून पाक, बांगलादेश आदी इस्लामी देशांमधील हिंदू आणि शीख यांच्यावरील अत्याचारांचे सूत्र जागतिक स्तरावर का उपस्थित करत नाही ?