अमेरिका कुणाला मूर्ख बनवत आहे ?

पाकला दिलेल्या एफ्-१६ विमानांच्या प्रकरणी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावले !

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने काही वर्षांपूर्वी पाकिस्तानला ‘एफ्-१६’ ही अमेरिकी बनावटीची ८५ अत्याधुनिक लढाऊ विमाने दिली होती. त्यांच्या नूतनीकरणासाठी आता अमेरिकेने साडेतीन सहस्र कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले आहे. याला भारताने आक्षेप घेतला आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी, ‘एकीकडे आतंकवादाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आम्ही हे करत आहोत’, असे सांगायचे आणि दुसरीकडे एफ्-१६ सारखी लढाऊ विमाने पाकला द्यायची. ही विमाने कुठे आणि कशासाठी दिली जात आहेत ?, हे सर्वांनाच ठाऊक आहे. अशा गोष्टी सांगून तुम्ही इतरांना मूर्ख बनवत आहात’, अशा शब्दांत अमेरिकेला सुनावले आहे. ‘अमेरिकेची धोरणे बनवणार्‍यांशी बोलण्याची संधी मिळाली, तर मी नक्कीच त्यांना ते काय करत आहेत ?, हे दाखवून देईन’, असेही जयशंकर म्हणाले. येथील भारतीय-अमेरिकी समुदायासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

एस्. जयशंकर यांनी या वेळी ‘पाकिस्ताशी असलेल्या संबंधांमुळे अमेरिकेचा कोणताही लाभ झाला नाही. या संबंधांतून ना पाकिस्तानचे हित झाले आहे, ना अमेरिकेचा लाभ झाला आहे’, असेही सांगितले.