अंकिता भंडारी हत्येच्या प्रकरणात भाजपच्या नेत्याच्या मुलाला अटक

भाजपचे नेते विनोद आर्य व त्यांचे पुत्र पुलकित आर्य

ऋषिकेश – जिल्ह्यातील एका रिसॉर्टमधून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय ‘रिसेप्शनिस्ट’ अंकिता भंडारी हिचा मृतदेह उत्तराखंड पोलिसांना ‘चिल्ला पावर हाऊस’जवळील कालव्यात सापडला. अंकिता भंडारी १८ सप्टेंबर या दिवशी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी भाजपचे नेते विनोद आर्य यांचे पुत्र पुलकित आर्य याच्यासह ३ जणांना अटक करण्यात आली आहे. वैयक्तिक वादानंतर तरुणीला रिसॉर्टजवळील कालव्यात ढकलून दिल्याची स्वीकृती पोलीस अन्वेषणात आरोपींनी दिली आहे. अंकिता भंडारी हिला आरोपी वेश्याव्यवसायात ढकलू पहात होते; परंतु तिने विरोध केल्याने त्यांनी तिची हत्या केली. ‘रिसॉर्ट’चा मालक पुलकित आर्य, व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि सहव्यवस्थापक अंकित गुप्ता यांच्यावर तरुणीच्या हत्येचा आरोप आहे. ‘अंकिता हिचा विनयभंग करून तिची हत्या केली’, असा आरोप अंकिताच्या वडिलांनी केला आहे.

१. उत्तराखंडमधील पौरी येथे पुलकित आर्य याचे ‘वनतारा’ हे रिसॉर्ट होते. या रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणारी अंकिता अचानक बेपत्ता झाली होती. याविषयी तरुणीचे कुटुंबीय आणि पुलकित आर्य यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

२. या हत्येमागे पुलकित याचा हात असल्याचे समोर येताच राज्य सरकारच्या आदेशानंतर ‘वनतारा’ रिसॉर्ट पाडण्यात आले, तसेच संतप्त जमावाने या ‘रिसॉर्ट’मध्ये घुसून त्याला आग लावली.