Raj Kundra Pornography Case : अश्‍लील व्हिडिओप्रकरणात मुंबईसह उत्तरप्रदेशातील १५ ठिकाणी ईडीची धाड !

राज कुंद्रा

मुंबई – अश्‍लील व्हिडिओ निर्मितीच्या माध्यमातून आर्थिक अपहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) मुंबईसह उत्तरप्रदेशातील १५ ठिकाणी धाडी घातल्या आहेत. यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांच्या निवासस्थानीही पोलिसांनी धाड घातली. अश्‍लील व्हिडिओजची निर्मिती करून भ्रमणभाषवरून ‘अ‍ॅप’द्वारे त्यांची विक्री केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या प्रकरणी ‘ईडी’ने गुन्हा नोंदवला आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये चित्रपट आणि ‘वेब सिरीज’ यांमध्ये काम देण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अश्‍लील व्हिडिओ करण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार एका युवतीने मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात केली होती. अश्‍लील व्हिडिओ निर्मिती करणार्‍यांचे जाळे असल्याचे या युवतीने तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीनंतर पोलिसांनी एका अभिनेत्रीसह अन्य काही लोकांना अटक केली होती. अशा प्रकारे अश्‍लील व्हिडिओजची निर्मिती करण्यामध्ये राज कुंद्रा यांचा सहभाग उघड झाल्यावर जून २०२१ मध्ये पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या प्रकरणात सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांना जामीन मिळाला होता.