मुंबई महानगरपालिकेने शिवसेनेच्या दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची अनुमती नाकारली !

मुंबई, २२ सप्टेंबर (वार्ता.) – कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न उपस्थित करून उद्धव ठाकरे अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शिवसेनेच्या दोन्ही गटांना मुंबई महानगरपालिकेकडून दसरा मेळाव्याची अनुमती नाकारण्यात आली. महानगरपालिकेने दोन्ही गटांच्या प्रतिनिधींना त्याविषयीचे पत्र पाठवले आहे.

१. उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या वतीने अनिल देसाई, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीने आमदार सदा सरवणकर यांनी महानगरपालिकेकडे मैदानासाठी अनुमती मागितली होती.

२. दोन्ही गटांना अनुमती नाकारतांना महानगरपालिकेने दोन्ही परस्परविरोधी अर्जदारांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास अनुमती मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. कोणत्याही एका अर्जदारास अनुमती दिल्यास या संवेदनशील परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था यांचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यास अनुमती नाकारण्यात येत असल्याचे नमूद केले आहे.

३. उद्धव ठाकरे यांचा गट या प्रकरणी न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने दसरा मेळाव्यासाठी वांद्रे येथील ‘बीकेसी’ मैदानात मेळावा घेण्याची अनुमती यापूर्वी घेतली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांत वाद होण्याची शक्यता आहे.