आम्ही बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये  ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

देहली – राज्यात मोठे परिवर्तन झाले. जगातील ३३ देशांची याची नोंद घेतली. हा उठाव होता. हा संघर्ष सत्तेसाठी नव्हता.   नगरसेवकही सत्ता सोडत नाही. आम्ही सत्तेचा त्याग करून गेलो. आम्ही मिंधे नव्हे, तर बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देहली येथे केले. मुंबई उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यानंतर ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, तुम्ही सत्तेच्या लालचेसाठी हिंदुत्व सोडले. गद्दार कोण ? ही विचार करण्याची वेळ आहे. बाळासाहेबांनी सांगितले होते, ‘‘काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना जवळ करायची वेळ येईल, तेव्हा मी माझे दुकान बंद करीन.’’ खुर्चीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी युती करण्यात आली. आम्ही सत्तेवर लाथ मारली; पण भूमिका पालटली नाही. त्यामुळे त्यांनी जो उठाव केला, त्याचे लोकांनी स्वागत केले.

शिंदे पुढे म्हणाले की, अडीच वर्षांत त्यांना गटप्रमुखांची आठवण झाली नाही. आम्ही क्रांती केली म्हणून आज आठवण झाली. ‘मातोश्री’, ‘वर्षा’ येथे त्यांना प्रवेश नव्हता. आम्ही घेणारे नाही, देणारे आहोत. माझ्यापेक्षा अधिक हिशोब कुणाजवळ असणार ?

शिवसैनिकांवर विश्वास नाही म्हणून शपथपत्र घेत आहेत, त्याचा खर्च शिवसैनिक करत आहेत. ‘आम्हाला बाप चोरणारे’ म्हटले गेले; मग आपण ‘बापाचा पक्ष आणि विचार विकणारी टोळी’ आहात का ? आम्ही दोन मासांत ४०० निर्णय घेतले. त्यामुळे लोकांना वाटले ‘अडीच मासात एवढे केले, तर अडीच वर्षांत किती करतील ?’ दाऊदचे हस्तक होण्याऐवजी आम्ही देशाला पुढे नेणार्‍यांचे हस्तक झालो आहोत. बाळासाहेबांचे नाव हिंदुहृदयसम्राट घेण्यासाठी अडचण येते. इतके तुम्ही निधर्मी झालात का ?