सावंतवाडी – तालुक्यातील मळेवाड पंचक्रोशीत खाण प्रकल्प चालू करण्याच्या हालचाली चालू असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर पंचक्रोशीत अशा प्रकल्पांना ठाम विरोध राहील, असे मत मळेवाडचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे ‘पर्यावरणास हानीकारक ठरणार्या प्रकल्पांना अनुमती दिल्यास तीव्र लढा उभारला जाईल’, अशी चेतावणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजन मुळीक यांनी दिली आहे.
याविषयी मराठे यांनी सांगितले की, असा प्रकल्प गावात नव्हे, तर पंचक्रोशीतसुद्धा नको. अशा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेणार आहे. राजन मुळीक यांनी या प्रकल्पांविषयी चेतावणी देतांना सांगितले की, आजगाव ग्रामपंचायतीच्या सीमेत ११.४ कि.मी. क्षेत्रात खाण प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया चालू आहे. अशा प्रकारे मळेवाड आणि धाकोरा या गावांमध्येही खाण प्रकल्पासाठी प्रयत्न चालू आहेत. सर्वार्थाने हानीकारक असलेल्या या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ संबंधित ग्रामपंचायतींनी देऊ नये अन्यथा तीव्र लढा उभारला जाईल.