काँग्रेसच्या सध्या चालू असलेल्या ‘भारत जोडो यात्रे’च्या निमित्ताने…
मरगळलेल्या काँग्रेसला उर्जितावस्थेत आणण्यासाठी आता खुद्द गांधी घराण्याचे युवराज अर्थात् राहुल गांधी मैदानात उतरले आहेत. काँग्रेसची मरगळ दूर सारण्यासाठी नुकतीच ‘भारत जोडो यात्रे’चा प्रारंभही झाला. कन्याकुमारीपासून १२ राज्यांतून मार्गस्थ होत ३ सहस्र ५७० किलोमीटरचे अंतर पार करून तब्बल १५० दिवसांनंतर या यात्रेचा काश्मीरमध्ये समारोप होईल. असे असले, तरी काँग्रेसची ही ‘भारत जोडो यात्रा’ नव्हे, तर ‘भारत तोडो यात्रा’ असल्याचा आरोप आता तिच्यावर समाजमाध्यमांतून होऊ लागला आहे. या यात्रेविषयीच्या अनेक गोष्टी समोर आल्या असून ही यात्रा ‘कंटेनर यात्रा’ असल्याची टीकाही चालू झाली आहे. यात्रेमध्ये प्रत्येक ठिकाणी जवळपास ६० कंटेनर सोबत असणार आहेत. त्यात आलिशान आणि एैसपैस सुविधांचा समावेश आहे. राहुल गांधी आणि त्यांचे नेते हॉटेलऐवजी या सर्व सोयीसुविधायुक्त कंटेनरमध्ये स्वतःचा मुक्काम ठोकणार आहेत. त्यामुळे राहुल यांना खरोखर भारताला जोडायचे आहे ? कि ‘पक्षात उरलीसुरली मानहानी वाचवण्यासाठी स्वतःला चमकवायचे आहे ?’, असा प्रश्न उपस्थित होतो.
१. सरकारी पैशांवर मौजमजा करण्याची काँग्रेसची जुनी परंपरा !
विशेष म्हणजे ‘राहुल यांचा प्रत्यक्ष कार्यस्तरावरचा अभ्यास किती आहे ?’, हे सांगण्याची आवश्यकता नाही. एवढेच काय, तर वर्ष १९७७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचे नातू राहुल गांधी यांचा जन्मदिवस तर चक्क विमानामध्येच साजरा केला होता. या वेळी त्यांच्यासह सोनिया गांधी यांसह अन्य कुटुंबीयही उपस्थित होते. त्यामुळे सरकारी पैशांवर मौजमजा करण्याची परंपरा काँग्रेससाठी अगदीच नवीन नाही.
२. यात्रेतून देशाला वेठीस धरले जाणार नाही ना ?
या यात्रेला ‘आंदोलनवादी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मेधा पाटकर, योगेंद्र यादव यांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे ‘या यात्रेचे पुढे काय होणार ?’, हे स्पष्टच आहे. पाकिस्तानमध्ये तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनीही यापूर्वी ‘कंटेनर पॉलिसी’ राबवली होती. त्यामुळे अनेकदा पाकिस्तानमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. काँग्रेसच्या या यात्रेतून देशाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शेतकरी आणि नागरिकत्व कायद्याला विरोध करणार्या शाहीनबाग येथील आंदोलनांच्या वेळी देहलीला वेठीला धरले गेले,‘त्याच धर्तीवर देशाला वेठीला धरण्यासाठीच, तर ही यात्रा नाही ना ?’, असाही प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे राहुल यांनी भारताला जोडण्याआधी काँग्रेसला एकसंध ठेवून जोडण्याचे काम करावे. तेच त्यांच्यासाठी पुष्कळ मोठे होईल.
– पवन बोरस्ते (साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, ८.९.२०२२)