सातारा, १६ सप्टेंबर (वार्ता.) – देशद्रोही आणि आतंकवादाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा देणारी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफझलखानवधाची जागा येणार्या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी (३० नोव्हेंबर २०२२) खुली न केल्यास महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त ती जागा मोकळी करतील, अशी चेतावणी ‘शिवप्रतापभूमी आंदोलना’चे निमंत्रक श्री. नितीन शिंदे यांनी महाबळेश्वर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस श्री. आदित्य पटवर्धन, सांगली येथील भाजप नगरसेविका अधिवक्ता (सौ.) स्वाती शिंदे, श्री. चेतन भोसले यांसह अन्य उपस्थित होते.
श्री. नितीन शिंदे पुढे म्हणाले, ‘‘आतापर्यंत मोठ्या उत्साहात शिवप्रतापदिन साजरा करणार्या शिवभक्तांवर पोलीस प्रशासनाने गुन्हे नोंद केले आहेत. अनेक वेळा सातारा जिल्हाबंदी केली. एकीकडे शासनाच्या वतीने हाताच्या बोटावर मोजण्याएवढे शिवभक्त आणि सरकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत शासन शिवप्रतापदिन साजरे करते, तर दुसरीकडे अफझलखानवधाच्या जागेला कुंपण घालून ते पहाण्यास अडथळा केला जातो. हा शासनाचा दुटप्पीपणा आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरपूर्वी शासनाने ही जागा खुली करावी.’’