लवंगा (जिल्हा सांगली) येथील ग्रामस्थांकडून चोर समजून साधूंना बेदम मारहाण : पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला !

जत (जिल्हा सांगली) – सांगली जिल्ह्यातील लवंगा या गावी उत्तरप्रदेश येथील ४ साधूंना ‘मुले पळवणारी चोरांची टोळी’ समजून मारहाण करण्यात आली. चा प्रकार १३ सप्टेंबर या दिवशी दुपारी घडला. उमदी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे या साधूंची सुटका झाली; अन्यथा या ठिकाणीही पालघरसारखी घटना घडली असती. वर्ष २०२० मध्ये पालघर जिल्ह्यात २ साधूंना चोर समजून जमावाने बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली होती. (ग्रामस्थांना जर ‘साधू चोर असतील’, असा संशय होता, तर त्यांनी साधूंना पकडून पोलिसांच्या कह्यात का दिले नाही ? कायदा हातात घेण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला ? हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने भारतात आज खरे साधू-संत हेही हिंदूंना कळेनासे झाले आहेत. त्यामुळे पालघर, जत यांसारख्या घटना घडत आहेत ! – संपादक) या प्रकरणी ६ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी पत्रकारांना दिली.

या संदर्भात अधिक माहिती अशी की,

१. उत्तरप्रदेशातील वाराणसी येथून ४ साधू कर्नाटक येथे देवदर्शनासाठी गेले होते. कर्नाटक येथील देवदर्शन आटोपून ते लवंगामार्गे विजापूर येथ जात होते. रस्त्यात गाडी थांबवून ‘विजापूर रस्ता कुठे जातो ?’, अशी विचारणा त्यांनी एका विद्यार्थिनीस केली.

२. या वेळी काही स्थानिक नागरिक तेथे आले. या लोकांना साधूंची भाषा कळली नाही. यातून ग्रामस्थांचा संशय बळावला आणि या साधूंना गाडीतून ओढून पट्ट्याने आणि काठीने मारहाण करण्यात आली. या वेळी साधूंनी वारंवार ‘आम्ही साधू आहोत’, असे सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र ग्रामस्थांनी त्यांचे ऐकले नाही.

३. या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या साधूंकडे अधिक अन्वेषण केले असता त्यांच्याकडे उत्तरप्रदेश येथील आधारकार्ड असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांकडे दूरभाषद्वारे माहिती विचारली असता, ते मथुरा येथील श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे साधू असल्याची माहिती मिळाली.

४. या सर्व घटनेनंतर साधूंनी या ग्रामस्थांना क्षमा करत अपसमजातून हा प्रकार झाल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार प्रविष्ट करण्यात आली नाही.

या संदर्भात ‘एन्.आय.ए.’ या वृत्तसंस्थेने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडे विचारणा केली असता, ‘या संदर्भात आमच्याकडे कोणतीही लेखी तक्रार नाही. तरी सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेले ‘व्हिडिओ’ आणि छायाचित्रे पाहून आम्ही वस्तूस्थिती जाणून घेत आहोत. या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल’’, असे सांगितले आहे.

 

संपादकीय भूमिका 

  • हिंदूबहुल देशात साधू-संतांना मारहाण करण्याच्या घटना वारंवार घडणे, हे संतापजनक !
  • ‘यामागे हिंदु साधूंची हत्या करण्याचे षड्यंत्र तर नव्हते ना ?’, याची सखोल चौकशी सरकारने करून सत्य समोर आणणे आवश्यक !