#Datta Datta #दत्त दत्त #श्रीदत्त श्रीदत्त #ShriDatta ShriDatta #mahalaya mahalaya #महालय महालय #pitrupaksha pitrupaksha #पितृपक्ष पितृपक्ष #shraddha shraddha #श्राद्ध श्राद्ध #ShraddhaRituals Shraddha rituals #श्राद्धविधी श्राद्धविधी #Shraddhavidhi Shraddha vidhi
१. धर्मशास्त्राने दिलेले अन्य पर्याय
१. ‘योग्य असे ब्राह्मण मिळाले नाहीत, तर मिळतील ते ब्राह्मण सांगून श्राद्ध करावे.
२. मातेच्या श्राद्धाला ब्राह्मण मिळाले नाहीत, तर सुवासिनी सांगून श्राद्ध करावे.
३. अनेक ब्राह्मण मिळाले नाहीत, तर एक ब्राह्मण सांगून त्याला पितृस्थानी बसवावे आणि देवस्थानी शाळिग्राम इत्यादी ठेवून संकल्प करून श्राद्ध करावे अन् ते पान गायीला घालावे किंवा नदी, तळे, सरोवर, विहीर इत्यादींमध्ये सोडावे.
४. राजकार्य, कारागृहात, रोग किंवा इतर काही कारणे यांमुळे मृताचे श्राद्ध करण्यास असमर्थ असल्यास पुत्र, शिष्य किंवा ब्राह्मण यांच्याद्वारे श्राद्ध करावे.
५. संकल्पविधी करावा, म्हणजे पिंडदानाविना बाकी सर्व विधी करावेत.
६. ब्रह्मार्पणविधी करावा, म्हणजे ब्राह्मणाला बोलावून हात-पाय धुतल्यावर त्याला आसनावर बसवून पंचोपचारे पूजा करून भोजन घालावे.
७. होमश्राद्ध करावे, म्हणजे द्रव्य आणि ब्राह्मण यांच्या अभावी अन्न शिजवून ‘उदीरतामवर०’ या सूक्ताची प्रत्येक ऋचा म्हणून होम करावा. (हे उत्तरक्रियेच्या वेळी पहाण्यास मिळते.)
२. वरील काहीही करण्यास असमर्थ असलेल्या माणसाने पुढील प्रकारे श्राद्ध करावे.
अ. उदकपूर्ण कुंभ दान द्यावा.
आ. थोडे अन्न दान द्यावे.
इ. तीळ दान द्यावेत.
ई. यथाशक्ती दक्षिणा द्यावी.
उ. यथाशक्ती धान्य दान द्यावे.
ऊ. गायीला गवत घालावे.
श्राद्धासाठीचा एक पर्याय : गायीला गवत घालणे
ग्रासमुष्टिं मया दत्तं सुरभिः प्रतिगृह्यताम् ।। – गोसावित्रीस्तोत्र, श्लोक २१
अर्थ : सर्व गायी माझ्या माता आणि सर्व बैल माझे पिता आहेत. मी दिलेला मूठभर चारा गायीने ग्रहण करावा.
गोमाता आणि बैल यांची पूजा केल्यामुळे सर्व पितर अन् देवता यांची पूजा होते. गायीच्या शेणाने भूमी सारवल्यावर सभागृह, मोठ्या इमारती, घर आणि मंदिरे आदी सर्व शुद्ध होतात. त्यामुळे गायींपेक्षा श्रेष्ठ आणि पवित्र आणखी दुसरा कोणता प्राणी असू शकतो ?
ज्या व्यक्तीजवळ श्राद्ध करण्यासाठी काहीच नसेल, त्या व्यक्तीने पितरांचे ध्यान करून गोमातेला श्रद्धापूर्वक गवत खाऊ घातले, तरी त्या व्यक्तीला श्राद्ध केल्याचे फळ मिळते. हे पुढील श्लोकात दिले आहे.
‘तृणानि वा गवे दद्यात्’।
(निर्णयसिन्धु) म्हणजे ‘गायीला गवत द्यावे.’
(साभार : मासिक ‘कल्याण’, भाग ९५)
ए. स्नान करून तीळयुक्त पाण्याने पितृतर्पण करावे.
ऐ. श्राद्धाच्या तिथीच्या दिवशी उपवास करावा.
३. वरीलपैकी काहीही करण्यास असमर्थ असल्यास पुढीलप्रमाणे श्राद्ध करावे.
अ. रानात जाऊन दोन्ही बाहू वर करून स्वतःच्या काखा दाखवत सूर्यादी लोकपालांना गवताची काडी दाखवून पुढीलप्रमाणे म्हणावे – ‘माझ्याजवळ श्राद्धोपयोगी धनसंपत्ती इत्यादी काहीही नाही. मी सर्व पितरांना नमस्कार करतो. माझ्या भक्तीने माझे सर्व पितर तृप्त होवोत. मी माझे हात वर केले आहेत.’
आ. निर्मनुष्य अरण्यात जाऊन हात वर करून मोठ्यांदा म्हणावे, ‘मी निर्धन आणि अन्नविरहित आहे. मला पितृऋणातून मुक्त करा.’
इ. दक्षिणेकडे तोंड करून रडावे.
या सर्व प्रकारांवरून प्रतिवर्षी येणार्या श्राद्धादिवशी पितरांना उद्देशून कोणत्यातरी प्रकाराने श्राद्ध केले पाहिजे, त्याविना राहू नये, हाच त्यातला मुख्य उद्देश असल्याचे लक्षात येते.’
४. श्राद्धविधींसाठी ब्राह्मण उपलब्ध नसल्याने त्यांना म्हणून इतर पद्धतीने श्राद्ध केल्यास तशा श्राद्धविधीचा लाभ होतो का ?
श्राद्धविधी करायला ब्राह्मण उपलब्ध नसल्यास हिंदु धर्मशास्त्रात पर्याय सांगितले आहेत. ते पर्याय भावपूर्ण केल्यास त्या श्राद्धविधीचा लाभ मिळतोच; मात्र काही जण ‘ब्राह्मण मिळतच नाहीत’, या नकारात्मक दृष्टीकोनातून ब्राह्मण शोधायलाच जात नाहीत किंवा ब्राह्मण मिळणे जरी शक्य असले, तरीही घरात परंपरेनुसार चालत आलेल्याच एखाद्या पद्धतीने श्राद्ध करतात. त्याने शास्त्राप्रमाणे श्राद्धविधी करण्याच्या तुलनेत अल्प लाभ मिळतो किंवा मिळतही नाही.’
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्ध’
(सौजन्य : सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संकेत स्थळ sanatan.org)
Sanatan Sanstha presents Shraddha Rituals App !
App is available in – Marathi, Hindi, Kannada, Gujarati, Telugu, Malayalam & English