श्राद्धसंबंधित प्रश्न आणि त्यांची उत्तरे

#Datta Datta #दत्त दत्त #श्रीदत्त श्रीदत्त #ShriDatta ShriDatta #mahalaya mahalaya #महालय महालय #pitrupaksha pitrupaksha #पितृपक्ष पितृपक्ष #shraddha shraddha #श्राद्ध श्राद्ध #ShraddhaRituals Shraddha rituals #श्राद्धविधी श्राद्धविधी #Shraddhavidhi Shraddha vidhi

प्रश्‍न : श्राद्धविधी चालू असतांना त्या ठिकाणी ‘ॐ’चा उच्चार करू नये, असे शास्त्रात सांगितले आहे. यावर्षी (वर्ष २०१६ मध्ये) पितृपक्षाच्या कालावधीत सर्व साधकांना ‘ॐॐ श्री गुरुदेव दत्त ॐॐ ।’ असा नामजप करण्यास सांगितले होते. श्राद्धविधी चालू असतांना ‘ॐ’ लावून नामजप केल्यास ते शास्त्रसंमत होणार नाही, तर कसे असावे ?

उत्तर : श्राद्धविधी चालू असतांना त्या ठिकाणी ‘ॐ’चा उच्चार करू नये, हे योग्य आहे. नामजप मनातल्या मनात (सूक्ष्मातून) करत असल्याने त्याला हा नियम लागू होत नाही. श्राद्धविधी चालू असतांना सध्या सांगितलेला ‘ॐॐ श्री गुरुदेव दत्त ॐॐ ।’ असा नामजप मनातल्या मनात करण्यास आडकाठी नाही; परंतु वैखरीतून (मोठ्याने) नामजप करायचा असल्यास तो ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा करावा. त्या वेळी मात्र ‘ॐ’ लावून नामजप करू नये; मात्र श्राद्धकर्त्याने मनातल्या मनात अथवा वैखरीतून (मोठ्याने) ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असाच नामजप करावा.

वेदमूर्ती केतन शहाणे

प्रश्‍न : श्री गणेशचतुर्थीच्या काळात काही ठिकाणी २१ दिवसांचा गणपति बसवतात. अशा वेळी पितृपक्षाच्या कालावधीत घरात श्री गणपति असतांना श्राद्ध करावे का ?

उत्तर : शास्त्रात ज्या कृतींसाठी जो काळ नेमून दिलेला आहे, त्या त्या काळात त्या कृती करणे आवश्यक आणि महत्त्वाचे ठरते. त्यामुळे पितृपक्षातच महालय श्राद्ध करावे. श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी एखाद्याचे सांवत्सरिक श्राद्ध असल्यास ते त्याच दिवशी करावे. श्राद्धाच्या स्वयंपाकातीलच नैवेद्य श्री गणपतीला दाखवावा. सर्वसाधारणपणे सूर्य वृश्‍चिक राशीत असेपर्यंत महालय श्राद्धाचा काळ सांगितला आहे. (या वर्षी हा काळ २५ सप्टेंबरपर्यंत आहे.) पितृपक्षात महालय श्राद्ध करण्याविषयी निरनिराळे पक्ष सांगितले आहेत. सांप्रत मृत व्यक्तीच्या (मृत्यू झालेल्या) तिथीलाच पितृपक्षात एक दिवस महालय श्राद्ध केले जाते. ज्यांच्या घरी २१ दिवसांचा गणपति पूजला जातो, त्यांच्या घरी श्री गणपति असेपर्यंत जर श्राद्ध तिथी येत असेल, तरीही त्यांनी त्याच तिथीला महालय श्राद्ध करावे. श्राद्धाच्या स्वयंपाकातीलच नैवेद्य श्री गणपतीला दाखवावा; मात्र श्राद्धाच्या दिवशी इतर विधी, उदा. श्री गणेशयाग, लघुरुद्र इत्यादी अनुष्ठाने करू नयेत. जननाशौच किंवा मरणाशौच (सुवेर-सुतक) किंवा अन्य काही अपरिहार्य कारणामुळे एखाद्याला त्या तिथीला महालय श्राद्ध करणे शक्य न झाल्यास सर्वपित्री अमावास्येला करावे. अन्यथा सोयीनुसार कृष्ण पक्षातील अष्टमी, द्वादशी, अमावास्या आणि व्यतीपात योग या दिवशीही महालय श्राद्ध करता येते.

प्रश्न : शास्त्रशुद्ध पितृशांती कुठे केली जाते ? त्रंबकेश्वरला होते असे ऐकिवात आहे पण नक्की माहिती नाही कृपया मार्गदर्शन करावे…

उत्तर : त्रिपींडी श्राद्ध, कालसर्प शांती, नारायण नागबली या विधींना प्रचलित भाषेत ‘पितृशांती’ असे म्हणतात, हे विधी वाराणसी, त्रंबकेश्वर, गया (बिहार) येथे केली जातात. आपण वरीलपैकी कुठेही विधी करु शकता.

प्रश्न : मी माझ्या मुलांसोबत माझ्या माहेरी रहाते. माझे पति विदेशात असतात. माझे सासरे वारले आहेत, तर मी माझ्या सास-यांचे महालय माझ्या माहेरी करू शकते का ? नाहीतर मग दुसरा काही उपाय ?

उत्तर : पतीच्या वतीने आमान्न श्राद्ध करू शकता. यामध्ये बटाटे, तूप, तीळ, गूळ आणि तांदूळ, विडा – नारळासहीत एकाद्या पुरोहिताला किंवा देवळात अर्पण करावे.

प्रश्न : पितृपक्षात जर सुतक पडले तर काय करावे ?

उत्तर : पितृ पक्षात जर सुतक पडले तर, मृत व्यक्तीची तिथी जर सुतक संपल्यावर येत असेल तर तेव्हा पितृपक्षातील विधी करू शकतो, जर मृत व्यक्तीची तिथी सुतक असलेल्या दिवसांत असल्यात सर्वपित्री अमावास्याला विधी करु शकतो. यात फक्त मृत व्यक्ती जर आपले आई-वडिल यांपैकी कोणी असल्यास त्यांचे श्राद्ध याच वर्षी करू शकत नाही. पुढील वर्षी करु शकतो.

प्रश्न : मला पण पितृदोष आहे असे म्हणतात. मला बघायचे होते आहे की नाही.

उत्तर : पितृदोष म्हणजे काय, पितृदोषाची लक्षणे, त्या मागील कारणे, पितृदोषांसाठी उपासना आणि त्या उपासनेचे लाभ यांविषयी जाणून घेण्यासाठी भेट द्या – https://www.sanatan.org/mr/a/11664.html

प्रश्न : का कुणास ठावूक…. पण पितृशांती केल्या वर माझा त्रास अजून वाढला. कारण काय असू शकेल ?

उत्तर : काहीवेळा त्रास कमी होताना तो वाढतो, त्यामुळे हे देखील त्रास कमी होण्याचे एक लक्षण असू शकते तसेच पितरांच्या त्रासाची तिव्रता अधिक असल्यास एकच विधी केल्याने त्याचा अपेक्षित लाभ हाेऊन त्रास दूर होईलच असे नाही, त्यासाठी नियमीत ।। श्री गुरुदेव दत्त ।। हा नामजप आणि कुटुंबियांच्या पत्रिकेनुसार अन्य विधी देखील करावे लागू शकतात.

प्रश्न : मी पण पितृदोष शांती केली पण काही फरक पडला नाही. चारही ब्राह्मणांना विचारले परंतु वेगवेगळी उत्तरे मिळाली. काय करावे ?

उत्तर : पितरांच्या त्रासाची तिव्रता अधिक असल्यास एकच विधी केल्याने त्याचा अपेक्षित लाभ हाेऊन त्रास दूर होईलच असे नाही, त्यासाठी नियमीत ।।श्री गुरुदेव दत्त ।। हा नामजप आणि कुटुंबियांच्या पत्रिकेनुसार अन्य विधी देखील करावे लागू शकतात.

प्रश्न : माझी आजी, आई यांनी आपले पूर्वज देवघरात ठेवले आहेत. बऱ्याच ठिकाणी चांदीचे देव बनवले जातात त्यात आपल्या पुर्वजाचा एक टाक हा असतो. तो ठेवावा का नाही ?

उत्तर : टाक ठेवणे योग्य नाही. ते विसर्जित करावे.

प्रश्न : जर एका व्यक्तीला चार मुले आहे व ती व्यक्ती गेल्या नंतर चारही जणांनी श्राद्ध घालावे का  ?

उत्तर : धर्मशास्त्रानुसार अनेक भावांची चूल वेगळी असेल तर सर्व कुलाचार, श्राद्ध इत्यादी स्वतंत्र करू शकतात.

– वेदमूर्ती केतन शहाणे, सनातन साधक-पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(सौजन्य : सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संकेत स्थळ sanatan.org)

Sanatan Sanstha presents Shraddha Rituals App !
App is available in – Marathi, Hindi, Kannada, Gujarati, Telugu, Malayalam & English

(चित्रावर क्लिक करा)