विसर्जनाचे अन्य सर्व पर्याय उपलब्ध असतांना १५० फिरते हौद भाडेकराराने घेण्याचा आयुक्तांचा निर्णय !
पुणे – गणेशोत्सवासाठी लोखंडी टाक्यांपासून मूर्ती संकलनापर्यंत सर्व नियमित गणेशमूर्तीच्या विसर्जनाचे पर्याय उपलब्ध होते; मात्र त्यानंतरही आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी गणेशोत्सवाच्या कालावधीत १५० फिरते हौद भाडेकराराने घेण्याचा निर्णय घेतला होता. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी या निर्णयाला आक्षेप घेतला होता. महापालिका प्रशासनाने दीड कोटी रुपये व्यय करून दीडशे फिरते हौद घेतले; मात्र त्यामध्ये केवळ १३ टक्के मूर्तींचे विसर्जन झाल्याची वस्तूस्थिती पुढे आली आहे. त्यामुळे आयुक्तांनी अट्टहास करून घेतलेला हा निर्णय चुकीचा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे असून पुणेकरांच्या कराचा वाया गेलेला पैसा आयुक्त विक्रम कुमार आणि अन्य अधिकारी यांच्या खिशातून वसूल करावा, अशी मागणी विवेक वेलणकर यांनी केली आहे. महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार वेलणकर यांनी नोंदवलेला आक्षेप खरा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
वेलणकर यांनी म्हटले आहे की, महापालिकेने विसर्जनासाठी शहरात, तसेच घाटांवर ४६ बांधलेले हौद, ३५९ लोखंडी टाक्या, १९१ मूर्ती संकलन आणि दान केंद्रे अशी व्यवस्था केली होती आणि ती वर्ष २०१९ पर्यंत पुरेशी ठरत होती. वर्ष २०२० आणि २०२१ मध्ये दळणवळणबंदीमुळे या विसर्जन व्यवस्था उपलब्ध नव्हत्या म्हणून महापालिकेने ६० फिरते विसर्जन हौद संपूर्ण शहरासाठी भाडेकराराने घेतले होते. ही व्यवस्था पुरेशी ठरली होती. या वेळचा उत्सव निर्बंधमुक्त असल्याने आणि दळणवळणबंदी नसल्याने सर्व नियमित गणेशमूर्ती विसर्जन पर्याय उपलब्ध होते; मात्र त्यानंतरही विक्रम कुमार यांनी १५० फिरते हौद भाडेकराराने घेण्याचा निर्णय घेतला याचाच अर्थ आयुक्तांच्या अट्टाहासामुळे नागरिकांच्या करांचे जवळपास दीड कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. हे अत्यंत संतापजनक आहे.
(चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा झालेला असतांनाही आधी प्रदूषणाचे कारण पुढे करत आणि गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांना वाहत्या पाण्यात मूर्तीविसर्जन करण्यास अटकाव करून १५० फिरते हौद भाडेकराराने घेण्याचा आयुक्तांचा निर्णय हा जाणूनबुजून गणेशभक्तांच्या धार्मिक भावनांशी खेळण्याचा प्रकार नव्हे का ? – संपादक)