पाकिस्तानला एफ्-१६ विमानांसाठी अमेरिकेकडून साडेतीन सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य !

  • पाकिस्तानला आतंकवाद्यांपासून असलेल्या भविष्यातील धोक्यापासून बचावासाठी अर्थसाहाय्य ! – अमेरिका

  • भारताकडून तीव्र निषेध !

नवी देहली – अमेरिकेने पाकिस्तानला एफ्-१६ लढाऊ विमानांसाठी तब्बल ४५ कोटी डॉलर्सचे (साधारण साडेतीन सहस्र कोटी रुपयांचे) साहाय्य जाहीर केले आहे. जो बायडन सरकारने पाकला आतंकवाद्यांपासून असलेल्या भविष्यातील धोक्यापासून बचावासाठी हे ‘पॅकेज’ जाहीर केले आहे. यासंदर्भात भारताने अमेरिकेकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. अमेरिकेचे दक्षिण आणि मध्य आशियाचे साहाय्यक सचिव डोनाल्ड लू यांच्याकडे भारताने या निर्णयाची वस्तूस्थिती आणि वेळ यांच्या संदर्भात अप्रसन्नता व्यक्त केली आहे.

१. गेल्या ४ वर्षांत अमेरिकेने संरक्षण क्षेत्रासाठी पाकला केलेले हे सर्वांत मोठे साहाय्य आहे. वर्ष २०१८ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकला आतंकवाद्यांपासून संरक्षणासाठी देण्यात येणारे २० कोटी डॉलर्सचे साहाय्य रहित केले होते. पाकला अफगाणिस्तानातील तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांच्या आतंकवाद्यांवर अंकुश ठेवण्यात आलेल्या अपयशानंतर ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतला होता.

२. एफ्-१६ कार्यक्रम हा अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या द्विपक्षीय संबंधांचा एक महत्त्वाचा भाग आहे. यासंदर्भात दीर्घकालीन धोरणानुसार अमेरिकेने पाकसाठी हे पॅकेज जाहीर केले, अशी माहिती अमेरिकेच्या प्रवक्त्याने दिली आहे. एफ्-१६ लढाऊ विमानांच्या पॅकेजमध्ये कोणतेही शस्त्र किंवा युद्धसामुग्री समाविष्ट नाही, असे स्पष्टीकरण अमेरिकेकडून देण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • पाकला मिळालेले सहस्रो कोटी रुपयांचे साहाय्य तो भारतामध्ये आतंकवाद फोफावण्यासाठी वापरेल. त्यामुळे आता भारताने अमेरिकेला समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर देणे आवश्यक !
  • जिहादी आतंकवादाच्या ९/११ च्या आजपर्यंतच्या सर्वांत मोठ्या जागतिक आक्रमणाला २१ वर्षे पूर्ण झाली असली, तरी अमेरिकेला ‘त्याला आळा घालण्यासाठी काय करावे ?’, हे लक्षात येत नाही, हे संतापजनक !
  • जिहादी आतंकवादाचा निर्माता असलेल्या पाकला तो संपवण्यासाठी सहस्रो कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य जाहीर होणे, यापेक्षा हास्यास्पद काय असेल ?