पुणे – अनंतचतुर्दशीला म्हणजेच ९ सप्टेंबरला सकाळी चालू झालेल्या पुण्यातील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका १० सप्टेंबरला सायंकाळपर्यंत चालूच होत्या. पुण्यातील मानाच्या पाच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन रात्री ९ वाजता पूर्ण झाल्यावर अन्य गणेशोत्सव मंडळांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन चालू झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती एरव्ही अलका चौकात पहाटे ५ अथवा सकाळी ६ वाजता येते. यंदा मात्र ती सव्वादहा वाजता आली. मिरवणुकीत वाद्य पथके आणि मंडळांचे कार्यकर्ते यांच्यात बरेच अंतर पडत होते. परिणामी मंडळे हळूहळू पुढे सरकत होती. पोलिसांनी ‘वाद्य पथकांमुळेच मिरवणुका लांबल्या’, असे सांगितले. लांबलेल्या विसर्जन मिरवणुकांविषयी सर्व स्तरांतून टीका होत आहे.