जालना – जिल्ह्यातील मोसंबी बागायतदारांच्या बुरशीमुळे झालेल्या हानीचे पंचनामे येत्या ८ दिवसांत करण्याचे निर्देश ७ सप्टेंबर या दिवशी येथील जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले आहेत. यामुळे हानीग्रस्त मोसंबी बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार असून यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. जालना जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांविषयी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती.
गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील बागायतदारांच्या मोसंबीवर बुरशीचा संसर्ग झाल्याने पुष्कळ प्रमाणात हानी झाली होती. या हानीची प्रत्यक्ष पहाणी करून दानवे यांनी ‘बागायतदारांना पंचनामे करून हानी भरपाई देण्यात येईल’, असा शब्द दिला होता. अतीवृष्टीविषयी संबंधित अधिकार्यांशी चर्चा करत त्यांनी हानीची माहिती घेतली. शेतकर्यांना नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरमुळे पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे महावितरणच्या अधिकार्यांना अतिरिक्त विद्युत् संच ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.