राज्यात प्रथमच ‘पीट एन्डीपीएस्’ कायद्याचा वापर !
पणजी, ७ सप्टेंबर (वार्ता.) – गोवा पोलिसांनी राज्यात पहिल्यांदाच पीट एन्डीपीएस् कायद्याचा वापर चालू केला आहे. पोलिसांनी या कायद्याखाली ३ मोठ्या अमली पदार्थ व्यावसायिकांना कह्यात घेऊन त्यांची एक वर्षासाठी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. राज्यातील अमली पदार्थ व्यावसायिकांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांनी या कायद्याला मुख्य अस्त्र बनवले आहे.
पोलिसांनी ६ सप्टेंबर या दिवशी केपे तालुक्यातील शिरवय-तिळामळ येथील वेली डिकोता या अमली पदार्थ व्यावसायिकाला, तर ७ सप्टेंबर या दिवशी एबिलिओ उपाख्य अबेल डिसोझा आणि जुवांव आंतोनियो या दोघा अमली पदार्थ व्यावसायिकांना कळंगुट येथील हुमटा वाडो येथे कह्यात घेतले. राज्यातील अमली पदार्थ व्यवसायात या तिघांचाही प्रमुख सहभाग असून ते मुख्य पुरवठादार असल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात दिसून आले आहे. तिघांवर अनेक पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद आहेत. या तिघांनाही एक वर्षाचा सक्तीचा कारावास असेल. त्यांना एक वर्ष जामिनासाठी अर्ज करायला संधी मिळणार नाही. यापूर्वी राष्ट्रीय ‘नार्कोटिक ब्युरो’ने राज्यात एकदाच पीट एन्डीपीएस् कायदा एका संशयिताला लागू केला होता. जसा गुन्हेगारी जगतात कायदा सुव्यवस्थेला धोका पोचवू शकणार्या व्यक्तीला राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला जातो, तशाच प्रकारची तरतूद पीट एन्डीपीएस् कायद्यात आहे. हा कायदा अमली पदार्थांशी संबंधित गुन्हेगारांना लागू करण्यात येतो.
संपादकीय भूमिकाहा कायदा आधीच लागू केला असता, तर अमली पदार्थ व्यवसाय एवढा फोफावला नसता ! प्राण कंठाशी आल्यावर नव्हे, तर आधीच उपाययोजना काढणे अपेक्षित आहे ! |