बिहार राज्यात मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित आणि पुजारी यांचा व्यापक संघटन उभारण्याचा निर्धार

हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या बैठकीत चर्चा !

मुझफ्फरपूर (बिहार) – सरकार मंदिरे चालवू शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असतांनाही मंदिरांचे सरकारीकरण अद्यापही चालूच आहे. एकीकडे बिहारमध्ये मंदिरांना ४ टक्के कर भरण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुजार्‍यांकडे दुर्लक्ष करून नमाज शिकवणार्‍यांना १५ सहस्र आणि अजान देणार्‍यांना १० सहस्र प्रतिमाह वेतन लागू करण्यात आले आहे. या अन्याय्य निर्णयांच्या विरोधात संपूर्ण राज्यात मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित आणि पुजारी यांचे व्यापक संघटन उभारण्याचा निर्धार येथील फलाहारी मठात झालेल्या बैठकीत करण्यात आला. हिंदु जनजागृती समिती आयोजित या बैठकीला सर्वश्री फलाहारी मठाचे महंत पवन दास, गरीबनाथ मंदिराचे मुख्य पुजारी महंत विनय पाठक, अखंड पुरोहित महासभेचे अध्यक्ष हरिशंकर पाठक, चाणक्य विद्यापती सोसायटीचे संरक्षक शंभूनाथ चौबे, हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक विश्वनाथ कुलकर्णी, तसेच पुरोहित वर्ग उपस्थित होता. बैठकीला अनेक पत्रकार उपस्थित होते. त्यांनी या बैठकीला व्यापक प्रसिद्धी दिली.

हिंदु जनजागृती समिती आयोजित बैठकीला उपस्थित मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित आणि पुजारी (समवेत समितीचे कार्यकर्ते)

शनिशिंगणापूर आणि शबरीमाला मंदिरांप्रमाणे बिहारमधील गया येथील विष्णुपद मंदिरातही अहिंदूंना प्रवेश न देण्याची परंपरा खंडित करण्यात आली आहे. हिंदू संघटित नसल्यानेच अशाप्रकारे हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचे प्रकार घडत आहेत. यादृष्टीने राज्यातील सर्व मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित आणि पुजारी यांना एकत्र करण्यासाठी नियमित मासिक बैठकांचे आयोजन करण्याचे या वेळी निश्चित करण्यात आले.