कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील खटला कोल्हापुरात चालवण्यासाठी शासनाकडे आवेदन सादर केल्याची आतंकवादविरोधी पथकाची न्यायालयात माहिती !

कोल्हापूर, ६ सप्टेंबर (वार्ता.) – कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील खटला कोल्हापूर येथील न्यायालयात चालवावा, असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे, अशी माहिती राज्य आतंकवादविरोधी पथकाने न्यायालयात दिली. पथकाच्या वतीने पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी न्यायालयात ही माहिती दिली. ही सुनावणी जिल्हा न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे. याची पुढील सुनावणी १९ सप्टेंबरला होणार आहे. सरकार पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे यांनी बाजू मांडली.

याचसमवेत संशयित समीर गायकवाड यांची हजेरी सोमवार ते शुक्रवार या कालावधीत कोल्हापूर येथे चालू करण्यात आलेल्या राज्य आतंकवादविरोधी पथकाच्या कार्यालयात आठवड्यातून एकदा घेण्यात यावी, असे आवेदन पथकाने न्यायालयात सादर केले आहे. याला समीर गायकवाड यांच्या अधिवक्त्यांनी विरोध करत समीर गायकवाड यांना कोल्हापूर येथील न्यायालयाने जामीन संमत करतांना ‘ही हजेरी प्रत्येक रविवारी देण्यात यावी’, अशी अट घालण्यात आली आहे, असे नमूद केल्याचे निदर्शनास आणून दिले.