गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि त्यावरील उपाय !

१. देशात गर्भपिशवीच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे भारतीय स्त्रियांनी त्याची तपासणी करून घेणे आवश्यक !

‘डॉक्टर, तुम्ही माझ्या गर्भाशयाच्या मुखावर जखम झाली असल्याचे गेल्या वर्षी सांगितले होते. तपासणीही करायला सांगितली होती; पण मला तपासणीसाठी यायला जमलेच नाही. आता फारच त्रास होत आहे’, असे महिला रुग्णाचे म्हणणे खरेतर प्रातिनिधिक आहे. अशा अनेक स्त्रिया आहेत की, ज्यांना स्त्रीरोगतज्ञ गर्भपिशवीच्या मुखाचा, म्हणजे ‘सर्विक्स’चा (गर्भाशय ग्रीवाचा) कर्करोग तर नाही ना, हे बघण्यासाठीची तपासणी करून घेण्यासाठी वारंवार सांगतात आणि स्त्रिया त्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष करतात. खरेतर ही तपासणी स्त्रीचे लैंगिक जीवन चालू झाल्यापासून प्रतिवर्षी करणे आवश्यक आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये जवळजवळ प्रत्येक स्त्रीची ही तपासणी केलीच जाते. आपल्या देशात गर्भपिशवीच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. तरीही भारतीय स्त्रिया ही तपासणी करून घ्यायला टाळाटाळ करतात. एकदा बाळंतपण झाले की, ‘शक्यतो स्त्रीरोगतज्ञांकडे फिरकायचेच नाही’, अशी वृत्ती बहुतेक महिलांमध्ये दिसून येते.

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

२. आता गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग का होतो ? आणि त्याचे त्वरित निदान कसे करावे ?

गर्भाशयाच्या मुखापाशी त्याच्या आतील आणि बाहेरील अशा दोन प्रकारच्या पेशींचा संगम होतो. त्याला ‘ट्रान्सिशन झोन’ (संसर्ग क्षेत्र) असे म्हणतात. या भागात जखमेसारखे व्रण निर्माण होतात. योनीमार्गात सगळ्या प्रकारचे जीवजंतू असल्यामुळे या व्रणांमध्ये लगेच जंतुसंसर्ग होतो आणि मग रुग्णाला खाज, जळजळ, आग, पांढरे जाणे असे त्रास चालू होतात. यासाठी योनीमार्गात सरकवण्याच्या गोळ्यांचा ‘कोर्स’ दिला जातो. तो व्यवस्थित पूर्ण करणे अतिशय आवश्यक असते. अन्यथा हा जंतुसंसर्ग होत रहातो. कधी कधी योनीमार्गाचा जंतुसंसर्ग वारंवार होऊ लागतो, तेव्हा रुग्ण आणि तिचे यजमान या दोघांनाही औषधे दिली जातात; कारण संसर्ग लैंगिक संबंधांमधून पसरण्याची शक्यता असते. बर्‍याच वेळा पुरुषांना काही त्रास होत नाही; पण ते जंतुसंसर्गाचे वाहक असतात. त्यामुळे त्यांना औषधे दिल्याखेरीज त्यांच्या पत्नी बर्‍या होत नाहीत. काही पुरुष औषधे घ्यायला सिद्ध नसतात. त्यांना पुष्कळ समजावून सांगावे लागते.

३. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा संसर्ग तपासण्यासाठी तपासणी उपलब्ध असणे

गर्भपिशवीच्या मुखाचा कर्करोग हा योनीमार्गात असलेल्या ‘ह्यूमन पापीलोमा’ या विषाणूमुळे होतो. या विषाणूची लागण गर्भपिशवीच्या मुखाला आहे का ? हे बघण्यासाठी आणि या भागातील पेशींच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी ‘एच्.पी.व्ही. + एल्.बी.सी.’ ही तपासणी उपलब्ध आहे. ही तपासणी एकदा केली आणि ‘नेगेटिव्ह’ आली, तर ५ वर्षांपर्यंत ती पुन्हा करावी लागत नाही. ‘एच्.पी.व्ही.’ या विषाणूचा संसर्ग स्त्रियांमध्ये लैंगिक संबंध चालू झाल्यावरच होऊ शकतो. विदेशात लैंगिक संबंध चालू झाल्यावर ‘पॅप स्मिअर’ तपासणी नियमित केली जाते. ‘एच्.पी.व्ही. + एल्.बी.सी.’ ही तपासणी अशीच; पण अधिक अचूक आहे.

४. गर्भपिशवीच्या मुखाच्या कर्करोगाविषयी स्त्रियांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक !

अल्प वयात लग्न, लगेच मूल होणे, अल्प अंतराने झालेली बाळंतपणे या गोष्टींमुळे गर्भपिशवीच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढते. या स्त्रियांमध्ये आणि कुटुंबियांमध्ये आरोग्याविषयी असलेली अनास्था हेही हा कर्करोग वेळेवर निदान न होण्यास कारणीभूत आहे. यासाठी शासकीय दवाखान्यात येणार्‍या स्त्रियांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. बर्‍याच स्त्रिया पुष्कळ वर्षे पिशवीच्या तोंडावर असलेल्या ‘सर्व्हायकल इरोजन’ जखमांसाठी स्त्रीरोगतज्ञांकडे जातात; पण तपासणी सांगितली की, टाळाटाळ करतात. ही तपासणी वेळेवर केली, तर पुढे होणारा मनस्ताप वाचू शकतो.

५. गर्भपिशवीच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे आणि उपचारपद्धती !

अधिक प्रमाणात पांढरे जाणे, लैंगिक संबंधांनंतर लालसर जाणे, दोन पाळ्यांच्या मध्ये लाल स्त्राव दिसणे, हे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात. पाळी थांबल्यानंतरही प्रतिवर्षी किमान एकदा स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करून घेणे अनिवार्य आहे आणि ही तपासणी वेळप्रसंगी तुमचा जीव वाचवू शकते. पाळी एकदा थांबली की, स्त्रिया स्त्रीरोगतज्ञांकडे पूर्णपणे पाठ फिरवतात. गर्भाशय, त्याचे मुख, ओव्हरी या अवयवांच्या कर्करोगाचे वेळेवर निदान होण्यासाठी नियमित तपासणी आणि ‘सोनोग्राफी’ करणे अत्यावश्यक आहे.

काही वेळा ‘एच्.पी.व्ही. + एल्.बी.सी.’ ही तपासणी साधारण असते; पण तिथल्या जखमेला वरवर जंतुसंसर्ग होऊन रुग्णाला त्रास होत रहातो. अशा वेळी ही जखम भूल देऊन जाळली जाते. त्यामुळे ‘सर्व्हिकल क्रियो किंवा थर्मल कॉटेरी’ (Cervical Criyo or Thermal Cautery) या उपचारपद्धतीने नंतर बर्‍याच स्त्रियांचा त्रास कायमस्वरूपी न्यून होतो. ‘एच्.पी.व्ही. + एल्.बी.सी.’ ही तपासणी पॉझिटिव्ह आली, म्हणजे ‘आपल्याला कर्करोग आहे’, असा त्याचा अर्थ नाही, तर गर्भाशयमुखाकडे अधिक बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे, असा आहे. मग त्या भागाची ‘बायोप्सी’ घेऊन आणि वारंवार तपासणी करून लक्ष ठेवले जाते.

६. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी लस उपलब्ध असणे

भारतात स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. सुदैवाने हा कर्करोग रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांत लस विकसित झाली आहे आणि ती सर्वत्र उपलब्ध आहे. कर्करोग रोखण्यासाठी लस कशी काम करते ? याविषयी पुष्कळ जणांच्या मनात शंका असू शकते. त्याचे उत्तर असे की, लैंगिक संबंध आल्यानंतर गर्भाशयाच्या मुखाला ‘एच्.पी.व्ही.’ नावाच्या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा संसर्ग अनेक वर्षे टिकून राहिला, तर त्याचे कर्करोगात रूपांतर होऊ शकते. या संसर्गापासून ‘एच्.पी.व्ही.’ लस स्त्रीचे रक्षण करते. साहजिकच कोणताही लैंगिक संबंध येण्यापूर्वी ही लस दिल्यास ती सर्वाधिक प्रभावी ठरते. त्यामुळे मुली वयात आल्यावर १६ ते १८ वर्षे वयापूर्वी ही लस देण्यात यावी. १५ वर्षांपूर्वी ही लस दिल्यास २ डोस द्यावे लागतात आणि त्यानंतर ३ डोस द्यावे लागतात.० (प्रारंभ), १ आणि ६ मास असे लस घेण्याचे वेळापत्रक असते.

७. भारतात लवकरच स्वदेशी बनावटीची ‘एच्.पी.व्ही.’ लस उपलब्ध होण्याची शक्यता !

सध्या भारतात ही लस आयात केली जात असल्याने तिची किंमत अधिक आहे. मागास, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या गरिबांना या लसीची पुष्कळ आवश्यकता आहे. त्या वर्गाला ही परवडू शकत नाही. अशा परिस्थितीत ‘सिरम इन्स्टिट्यूट’ लवकरच स्वदेशी बनावटीची लस बाजारात आणणार आहे. स्वदेशी असल्याने ही लस अल्प किंमतीला उपलब्ध होईल. सर्व मुलींच्या पालकांनी याचा लाभ घेऊन त्यांच्या मुलींना ही लस अवश्य द्यायला हवी. या लसीचा लाभ पुरुषांनाही आहे. या लसीमुळे त्यांना तोंड, घसा, लैंगिक अवयव, गुद्द्वार येथील कर्करोगांपासून संरक्षण मिळू शकते. त्यामुळे काही देशांमध्ये वयात आलेल्या मुलांनाही ही लस देण्यास प्रारंभ झाला आहे.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीचे लसीकरण झाले असले, तरीही नियमित तपासणी अत्यावश्यक आहेच. दुसरे म्हणजे लग्न झालेल्या अथवा लैंगिक संबंध आधीच आलेल्या स्त्रियाही ‘एच्.पी.व्ही.’ ही लस घेऊ शकतात; पण त्याचा पूर्ण लाभ त्यांना मिळू शकत नाही आणि नियमित तपासणी महत्त्वाची ठरते. अशा साध्या तपासण्या आणि वेळेवर लसीकरण केले, तर तुम्ही पुष्कळ मोठे आजार टाळू शकाल.

– डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्वतज्ञ, कोथरूड, पुणे. (साभार : डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी यांचे ‘फेसबूक पेज’)