प्रदूषणास हातभार लावणार्‍या कोल्हापूर महापालिकेला ‘श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होते’ असे सांगण्याचा अधिकार नाही ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

पंचगंगा प्रदूषण प्रकरणी महापालिकेला २ कोटी २० लाख रुपये दंडाची नोटीस

कोल्हापूर – पंचगंगा प्रदूषण प्रकरणी कोल्हापूर महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने २ कोटी २० लाख रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. महापालिकेकडे असलेल्या शकडो वाहनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी असलेल्या ‘सुभाष स्टोअर्स’ या वर्कशॉपमधील वाहने धुतल्यावर त्याचे सांडपाणी जयंती नाल्यात जाते. हेच पाणी पुढे पंचगंगा नदीत मिसळते. त्यातून मोठ्या प्रमाणात पंचगंगा नदीचे प्रदूषण होते, तसेच सुभाष स्टोअर्स विनाअनुमती चालू असल्याची याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे करण्यात आली आहे. त्यावर सध्या सुनावणी चालू आहे. यावरून महापालिकेचा दुतोंडीपणा स्पष्ट होत असून असे दिसते की, जी महापालिका स्वत:च प्रदूषित पाणी पंचगंगा नदीत सोडते त्या महापालिकेने ‘श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते’, असे म्हणणे अत्यंत हास्यास्पद आहे. त्यामुळे प्रदूषणास हातभार लावणार्‍या कोल्हापूर महापालिकेला श्री गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते असे सांगण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.