पुणे येथील चांदणी चौकातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी जुना उड्डाणपूल पाडणार !

पुणे – कोथरूड परिसरातील चांदणी चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी एन्.डी.ए.-मुळशी रस्त्यावरील उड्डाणपूल पाडून तेथे नवा पूल उभारण्यात येणार आहे. हा जुना उड्डाणपुल १२ ते १५ सप्टेंबर या कालावधीत पाडला जाणार आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या सेवा वाहिन्या (पाणीपुरवठा, दूरध्वनी, विद्युत् वाहिनी आणि इतर विविध वाहिन्या) स्वव्ययाने काढाव्यात, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

चांदणी चौकात प्रतिदिन वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याचा अनुभव आला. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूककोंडीचे सूत्र चर्चेत आले. त्यानंतर स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या संदर्भात आदेश दिल्यानंतर प्रशासकीय पातळीवर वाहतूककोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना चालू झाल्या. त्याअंतर्गत वाहतूककोंडीला कारणीभूत ठरणारा जुना उड्डाणपूल पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.