विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील आयकर विभागाच्या कारवाईत बेहिशेबी रोकड, सोने आणि मालमत्ता आढळली नाही !

राजकीय विरोधकांचे षड्यंत्र ! – अभिजित पाटील, अध्यक्ष, विठ्ठल सहकारी साखर कारखाना

धाराशिव – जिल्ह्यातील पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर चालू असलेली आयकर विभागाची कारवाई संपली; मात्र ‘या कारवाईत आयकर विभागाला बेहिशेबी रोकड, सोने किंवा इतर मालमत्ता आढळली नाही.’ असे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी म्हटले आहे.

२५ ऑगस्टपासून आयकर विभागाकडून साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि ‘डीव्हीपी’ उद्योग समुहाचे सर्वेसर्वा अभिजित पाटील यांचे कार्यालय आणि कारखाना यांवर ही कारवाई चालू होती.

अभिजित पाटील

अभिजित पाटील म्हणाले की, ज्या कागदपत्रांत त्रुटी आढळल्या, त्यांची पूर्तता येत्या १५ दिवसांत करण्याची सूचना आयकर विभागाने दिली आहे. या धाडीत जप्त करण्यात आलेली १ कोटी १२ लाख रुपयांची रोकड आणि ५० ते ६० तोळे सोनेही आयकर विभागाने परत केले आहे. मी दिलेल्या माहितीमुळे आयकर विभागाचे समाधान झाले आहे.