ऑगस्ट २०२१ मध्ये बडनेरा (अमरावती) येथील सौ. सुमन दत्तात्रेय दुसे यांचे अनेक अवयव (किडनी (मूत्रपिंड), लिव्हर (यकृत) आणि हृदय) कमकुवत (Multiorgan failure) झाल्याने त्या प्रदीर्घ काळ रुग्णाईत होत्या. गुरुकृपेने त्या यातून बर्या झाल्या. त्या रुग्णाईत असतांना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती यांचा काही भाग आपण ३०.८.२०२२ या दिवशी पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
(भाग २)
भाग १ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/608857.html
३. श्री. किरण दुसे (मुलगा), अमरावती
३ अ. आईची प्रकृती गंभीर असल्याचे कळल्यावर मन अस्वस्थ होणे; परंतु अमरावतीला घरी गेल्यावर देवाच्या कृपेने स्थिर रहाता येणे : आईची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितल्याचे मला वडिलांनी भ्रमणभाषवर कळवले. तेव्हा मी सेवेनिमित्त कोल्हापूर येथे होतो. वडिलांचा भ्रमणभाष आल्यापासून माझ्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. ‘या वेळी काहीतरी मोठे संकट आले आहे आणि आपल्याला तातडीने अमरावतीला जायला हवे’, असे मला वाटत होते. नंतर घरी जाऊन आईला रुग्णालयात भरती केल्यावर तिची गंभीर स्थिती माझ्या लक्षात आली. असे असतांना ‘देवानेच मला स्थिर ठेवले आणि घरी येण्याची सद्बुद्धी दिली’, असे मला वाटले.
३ आ. आईच्या मूत्रपिंडांचे कार्य चालू होणे; परंतु ताप येण्याचे कारण न कळणे : १३.८.२०२१ या दिवशी आईच्या मूत्रपिंडांचे कार्य चालू झाले; मात्र तापाचे प्रमाण उणावत नव्हते. त्यासाठी विविध चाचण्या करण्यात आल्या; परंतु तापाचे नेमके कारण कळत नव्हते. त्या वेळी तिची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती.
३ ई. आई बेशुद्धावस्थेत असतांना तिला नागपूर येथील रुग्णालयात भरती करणे आणि ३ आठवडे औषधोपचार केल्यानंतर तिला जरा बरे वाटणे : त्यानंतर आई बेशुद्धावस्थेत असतांनाच तिला नागपूर येथील रुग्णालयात भरती केले. तिथे २ दिवसांनंतर ती शुद्धीवर आली. त्यानंतर तिच्यावर औषधोपचार चालू केले. तेथे दीड महिन्याने आईच्या घशातील नळी (ट्यूब) काढली आणि तिला थोडे बोलता येऊ लागले. नंतर ती व्यवस्थित बोलू लागली. अशा प्रकारे आईला जरा बरे वाटल्यावर तिला रुग्णालयातून घरी आणले.
३ उ. आईच्या आजारपणात संतांची अनुभवलेली प्रीती आणि कृपा !
३ उ १. आईला नागपूरला रुग्णालयात भरती केल्यावर तेथे साधक आणि त्याची पत्नी यांची जेवण अन् निवास यांची साधकांनी सोय करून देणे आणि पू. अशोक पात्रीकर यांनी आईच्या प्रकृतीची विचारपूस करणे : आधुनिक वैद्यांनी आईला नागपूर येथील रुग्णालयात भरती करण्यास सांगितले. तेव्हा मी आणि माझी पत्नी (सौ. काव्या किरण दुसे), आम्ही दोघेही नागपूरला गेलो. तेथे आमचे जेवण आणि निवास यांची व्यवस्था करण्याविषयी मी उत्तरदायी साधकांशी बोललो. त्यांनी लगेच नियोजन करून दिले. पू. अशोक पात्रीकरकाका वेळोवेळी आईच्या प्रकृतीविषयी विचारपूस करत होते आणि ‘काही साहाय्य लागले, तर सांगा’, असे सातत्याने सांगत होते.
३ उ २. सद्गुरु स्वाती खाडये यांच्याशी बोलल्यावर मनाला उभारी येऊन रुग्णाईत आईच्या संदर्भात कृती करण्यास शक्ती मिळणे : आईची प्रकृती गंभीर झाल्याने माझे मन थोडे निराश झाले होते. ‘मी घरी यायला उशीर केला’, असे मला सातत्याने वाटत होते. त्या वेळी मी सद्गुरु स्वाती खाडये यांच्याशी बोललो. तेव्हा त्यांनी आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन मला आधार दिला. त्यांनी मला जे काही घडेल, ते साधना म्हणून स्वीकारण्यास सांगितले, तसेच त्यांनी माझे वडील आणि माझी पत्नी सौ. काव्या यांच्याशी बोलून त्यांनाही आधार दिला. त्यांच्याशी बोलल्यानंतर आमच्या मनाला उभारी मिळाली आणि रुग्णाईत आईच्या संदर्भात कृती करण्यास शक्तीही मिळाली.
३ उ ३. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी आस्थेने विचारपूस करणे : जळगाव येथे एका साधकाकडून सद्गुरु जाधवकाका यांना आईच्या प्रकृतीविषयी कळल्यावर त्यांनी भ्रमणभाष करून तिची आस्थेने विचारपूस केली. ‘कधी आवश्यकता लागली, तर संपर्क करा’, असेही त्यांनी सांगितले.
३ उ ४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी आईसाठी वेळोवेळी नामजपादी उपाय शोधून देणे : आई आजारी पडल्याच्या पहिल्या दिवसापासून तिची प्रकृती चांगली होईपर्यंत ‘आईसाठी कोणता नामजप करायचा ?’, याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना कुठल्याही क्षणी भ्रमणभाष केला, तरी ते नामजपादी उपाय शोधून द्यायचे. आईला सद्गुरु काकांच्या उपायांनी बरे वाटल्यावर आणि तिला रुग्णालयातून सोडल्यावर मी सद्गुरु काकांना भ्रमणभाष करून कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘हे आपले कर्तव्यच आहे आणि गुरुमाऊली सर्वकाही करत आहे.’’
३ उ ५. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भ्रमणभाषवरून कुटुंबियांची विचारपूस केल्यावर आधार वाटणे : आईला अमरावती येथील रुग्णालयात भरती केल्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा मला भ्रमणभाष आला. त्यांनी आई आणि घरातील व्यक्ती यांची विचारपूस करून स्थिती जाणून घेतली, तसेच मला आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन प्राप्त परिस्थिती स्वीकारण्यास सांगितले. त्यांचा दूरभाष आल्यानंतर आम्हाला आधार वाटला.
३ ऊ. कृतज्ञता : ‘केवळ गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेनेच वरीलप्रमाणे विविध संतांच्या माध्यमातून आईच्या आजारपणात आम्हाला त्यांचे साहाय्य लाभले. त्यांनी आम्हाला संतांचे प्रेम आणि कृपा अनुभवायला दिली’, त्याबद्दल गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’ (क्रमशः)
(सर्व सूत्रांचा दिनांक : ३०.१२.२०२१)
भाग ३ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/609511.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |