बडनेरा (अमरावती) येथील सौ. सुमन दत्तात्रय दुसे (वय ५९ वर्षे) गंभीर रुग्णाईत असतांना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पदोपदी अनुभवलेली गुरुकृपा !

ऑगस्ट २०२१ मध्ये बडनेरा (अमरावती) येथील सौ. सुमन दत्तात्रेय दुसे यांचे अनेक अवयव (किडनी (मूत्रपिंड), लिव्हर (यकृत) आणि हृदय) कमकुवत (Multiorgan failure) झाल्याने त्या प्रदीर्घ काळ रुग्णाईत होत्या. गुरुकृपेने त्या यातून बर्‍या झाल्या. त्या रुग्णाईत असतांना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती यांचा काही भाग आपण ३०.८.२०२२ आणि १.९.२०२२ या दिवशी पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.  

(भाग ३)

भाग २ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/609150.html
सौ. सुमन दुसे

४. कु. माधुरी दत्तात्रय दुसे (लहान मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

कु. माधुरी दुसे

४ अ. आईला अतीदक्षता विभागात भरती केल्याचे भावाकडून कळल्यावर काळजी वाटणे आणि नंतर गोव्याहून घरी यायला निघतांना देवाच्या कृपेने स्थिर रहाता येणे : ‘१०.८.२०२१ ते १२.८.२०२१ या दिवसांत आईची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला अतीदक्षता विभागामध्ये भरती केले होते. तेव्हा आधुनिक वैद्यांनी ‘आता सर्व देवाच्याच हातात आहे’, असे भावाला (श्री. किरण दुसे यांना) सांगितले होते. त्या वेळी मी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात होते. भावाने आईची स्थिती सांगितल्यावर मला काळजी वाटली; पण मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला स्थिर रहाता आले. त्यामुळे मला सेवा करता आली. ‘आपल्या समवेत देव आहे’, असे मला वाटत होते. गोव्याहून बडनेरा (अमरावती) येथे जातांना २ दिवस प्रवासातही मला स्थिर रहाता आले.

४ आ. आईला ‘तू लवकर बरी हो, तुला सेवा करायची आहे’, असे सांगितल्यावर तिने बोलण्याला प्रतिसाद देणे : १५.८.२०२१ ते २१.८.२०२१ या दिवसांत मी आईला भेटायला रुग्णालयात जात होते. तेव्हा मी तिला म्हणाले, ‘‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘तुझ्यासाठी गुरुस्मरण कर आणि नामजप कर’, असा निरोप दिला आहे.’’ तेव्हा ती हावभावातून प्रतिसाद देत होती. मी तिला म्हणाले, ‘‘मी रामनाथीहून तुझ्यासाठी तीर्थ आणले आहे. लवकर बरी हो. आपल्याला पुष्कळ सेवा करायची आहे.’’ ती माझे बोलणे एकाग्रतेने ऐकत होती. माझे बोलणे ऐकून तिला आनंद झाला आणि तिने डोळ्यांच्या पापण्या हलवून प्रतिसाद दिला.

४ इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी बोलल्यानंतर ‘परिस्थिती स्वीकारता येऊन स्थिर रहाता येऊ दे’, अशी प्रार्थना होणे : एकदा ‘आईने जगण्याची इच्छा सोडून दिली’, असे मला वाटले. तेव्हा मला तिची काळजी वाटली. मी तिला म्हणाले, ‘‘आपल्याला पुष्कळ सेवा करायची आहे.’’ तेव्हा ‘तिने होकार दर्शवला’, असे मला वाटले. त्यानंतर तिचे शरीर औषधोपचारांना प्रतिसाद देऊ लागले; पण तिचा ताप उतरत नव्हता. आधुनिक वैद्यांनी हात टेकले. तेव्हा आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती भावनिक झाली. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी माझे भ्रमणभाषवरून बोलणे झाले. तेव्हा त्यांनी ‘सकारात्मक रहा. गुरुस्मरण करा. प्रारब्ध आपल्या हातात नाही’, असा निरोप दिला. आम्ही सर्व जण एकमेकांना या वाक्याची आठवण करून देत होतो. एकदा मी देवाला म्हणाले, ‘‘देवा, मला आई हवी आहे.’’ तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे वरील वाक्य आठवून माझ्याकडून देवाला प्रार्थना झाली, ‘आमच्या साधनेच्या दृष्टीने जे आवश्यक आहे, ते होऊ दे. आम्हाला परिस्थिती स्वीकारता येऊन स्थिर रहाता येऊ दे.’

४ ई. आई शुद्धीवर येत असतांना ‘ती अनुसंधानात असून स्थिर आहे’, असे जाणवणे : आईच्या चेहर्‍याकडे बघून ‘तिचा नामजप आणि अनुसंधान चालू असून ती आतून परात्पर गुरु डॉक्टरांशी बोलत आहे’, असे मला वाटत होते. आई शुद्धीवर येत असतांना मला ती स्थिर वाटली.

४ उ. आईची सेवा करतांना भावनिक झाल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टर सर्व करून घेतील’, या विचाराने हळूहळू तिची सेवा करणे जमू लागणे आणि त्यातून आनंद मिळणे : २७.९.२०२१ या दिवशी रात्री १२ वाजता आईला रुग्णालयातून घरी आणले. आईला साधारण २ मास काहीच करता येत नव्हते. तेव्हा आईला जराही हलता येत नव्हते. मी तिची सेवा करायचे. तेव्हा ‘तिला दुखेल का ? तिला काही त्रास होईल का ? मला तिची सेवा करायला जमेल का ?’, असे विचार मनात येऊन माझे मन भावनिक व्हायचे. नंतर ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांची साधिका आहे. तेच माझ्याकडून सर्व करून घेतील’, असा विचार केल्यावर हळूहळू मला आईच्या सर्व सेवा करायला जमू लागले. नामजप करत सेवा करतांना मला आनंद मिळू लागला. आईने रात्री हाक मारल्यावरही मला लगेच जाग यायची आणि तिला साहाय्य करता यायचे.

४ ऊ. वहिनींना सेवेसाठी कोल्हापूर येथे जावे लागणे, तेव्हा ‘आईची सेवा करायला जमेल का ?’, या विचाराने ताण येणे आणि सौ. सुप्रिया माथूर यांचे ‘जेथे कर्तेपणा आहे, तेथे भगवंताचे अस्तित्व नाही’, हे वाक्य आठवून स्थिर रहाता येणे : याच कालावधीत माझ्या वहिनींना ग्रंथांच्या संदर्भातील सेवेसाठी कोल्हापूर येथे जावे लागणार होते. तेव्हा प्रथम ‘घरातील सर्व कामे आणि आईचे आवरणे मला जमेल का ?’, या विचाराने मला ताण आला. तेव्हा मला माझ्या व्यष्टी साधनेच्या आढावासेविका सौ. सुप्रिया सुरजित माथूर (आताची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) घेत असलेल्या आढाव्यातील त्यांचे एक वाक्य आठवले, ‘ताण आला, म्हणजे कर्तेपणा आला आणि जेथे कर्तेपणा आहे, तेथे भगवंताचे अस्तित्व नाही, असे समजायचे.’ त्यानंतर ‘वहिनींची सेवा महत्त्वाची आहे आणि गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला बळ देऊन सर्व करून घेतील’, या विचाराने मला स्थिर रहाता आले.

(क्रमश:)

(सर्व सूत्रांचा मास : डिसेंबर २०२१)