‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहिमेअंतर्गत युवकांना राष्ट्र-धर्माप्रती कृतीशील करण्याची मोहीम !
रायगड – ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ या मोहिमेअंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २४ नोव्हेंबर या दिवशी पाली (रायगड) येथील सरसगड येथे मोहीम पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचे दैदीप्यमान शौर्य, राष्ट्र आणि धर्म यांसाठी त्यांचे योगदान हिंदु युवक आणि युवतींच्या मनात बिंबवणे, तसेच वर्तमानकाळात हिंदूसंघटनाचे महत्त्व, राष्ट्र-धर्म यांप्रती असलेल्या दायित्वाची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने समिती मोहीम राबवत आहे. या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सरसगड येथे पुष्कळ जणांनी मोहिमेत सहभाग घेतला.
या वेळी पनवेल, खोपोली आणि वर्हाड येथील धर्मशिक्षणवर्ग, स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग आणि युवा सत्संगातील युवा सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीच्या वर्हाड गावातील शाखा सेवक श्री. नरेंद्र खंडागळे यांनी सर्वांना गडाची माहिती दिली. गडाच्या शिखरावर पोचल्यावर तेथील महादेव मंदिर परिसरात वाढलेले अनावश्यक गवत काढून, प्लास्टिक कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली. एकत्रित भोजन झाल्यावर समितीचे रायगड जिल्हा समन्वयक श्री. राजेंद्र पावसकर यांनी मोहिमेत सहभागी युवावर्गाला संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची उदाहरणे देऊन त्यांनी जीवनातील अध्यात्म आणि गुरुसेवा यांचे महत्त्व स्पष्ट केले, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रतीचे दायित्व पूर्ण करण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सिद्ध होऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सक्रिय रहाणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर महादेव मंदिरात सामूहिक नामजप करण्यात आला. सर्वांना दंडसाखळीचे प्रशिक्षण देण्यात आले. शेवटी वर्हाड गावातील शाखा विस्तारक श्री. रोशन खंडागळे यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेऊन मोहिमेची सांगता झाली.
अभिप्राय
१. श्री. संतोष खंडागळे, वर्हाड – आपण समाजाचे देणे लागतो. त्यासाठी आपण राष्ट्र-धर्माचे कार्य केले पाहिजे.
२. श्री. संतोष कुंडेकर, खोपोली – अपघातामुळे माझ्या पायात स्टीलचा रॉड बसवला आहे; पण मी गडावर चढू शकलो.
३. श्री. विनोद अधिकारी, वर्हाड – मी अनेकदा गडावर आलो; पण येथे येऊन सेवा केल्याने मिळालेला आनंद पहिल्यांदाच अनुभवला.
४. कु. धनश्री शिरसाठ, पनवेल – गड चढायला प्रारंभ केल्यापासून ‘देव मला साथ देत आहे’, असे जाणवले.