ऑगस्ट २०२१ मध्ये बडनेरा (अमरावती) येथील सौ. सुमन दत्तात्रेय दुसे यांचे अनेक अवयव (किडनी (मूत्रपिंड), लिव्हर (यकृत) आणि हृदय) कमकुवत (Multiorgan failure) झाल्याने त्या प्रदीर्घ काळ रुग्णाईत होत्या. गुरुकृपेने त्या यातून बर्या झाल्या. त्या रुग्णाईत असतांना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत. (भाग १)
१. श्री. दत्तात्रेय दुसे (यजमान, वय ६५ वर्षे), बडनेरा, अमरावती.
१ अ. पत्नी रुग्णाईत असतांना आधुनिक वैद्यांनी उपचार करूनही यश न येणे आणि संतांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे पत्नीला जीवनदान मिळणे : ‘सौ. सुमनचे (पत्नीचे) शारीरिक त्रास अकस्मात् वाढल्यामुळे आम्ही तिला आमच्या घराजवळील रुग्णालयामध्ये भरती केले आणि तिथे तिच्यावर उपचार चालू केले. आधुनिक वैद्यांनी प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही; म्हणून त्यांनी आम्हाला ‘तिला घरी घेऊन जाऊ शकता’, असे सांगितले. त्यानंतर ती वैद्यकीय उपचार न घेता बरी झाली. ‘गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने संतांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांच्या माध्यमातून देवानेच तिला जीवनदान दिले आणि आम्हा सर्वांची साधना होण्यासाठी तिला मरणाच्या दारातून परत आणले’, असे मला वाटले. अशा या कठीण प्रसंगामध्ये माझ्या मनात येणारे काळजीचे विचार गुरुकृपेने न्यून झाले आणि मी स्थिर राहू शकलो.
१ आ. संकटांची मालिका आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !
१ आ १. रुग्णालयातून घरी येत असतांना मार्गात अपघात होणे आणि त्या वेळी फारशी दुखापत न होणे : मी सुमनला भेटून रुग्णालयातून घरी येत असतांना मार्गात माझा अपघात झाला. त्या वेळी मागून येणारे चारचाकी वाहन लगेच थांबल्याने मला फार दुखापत झाली नाही. तेव्हा ‘गुरुदेवांनी वाचवले’, असे मला जाणवले. त्या कालावधीत पत्नीला नागपूरला नेण्याचे ठरले होते.
१ आ २. नातू रुग्णाईत होणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे स्थिर रहाता येणे : त्याच वेळी माझ्या मोठ्या मुलीच्या (सौ. वसुधा विष्णु राठीवडेकर याच्या) मुलाला ताप आल्याने त्याला रुग्णालयामध्ये भरती केले होते. तेव्हा आरंभी माझे मन अस्थिर झाले; पण नंतर मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच स्थिर रहाता आले.
१ आ ३. पत्नीला रुग्णालयातून घरी आणतांना रुग्णालयाचे देयक भरण्यासाठीची रक्कम पाठवायला अडचण येणे आणि गुरुकृपेने एका दुकानदाराने साहाय्य केल्याने रक्कम भरता येणे : सुमनला रुग्णालयातून घरी सोडणार होते. तेव्हा रुग्णालयाचे संपूर्ण देयक भरण्यासाठीची रक्कम माझा मुलगा किरण याच्याजवळ नव्हती आणि मीही तेथे नव्हतो. देयक पूर्ण भरल्याविना सुमनला रुग्णालयातून घरी आणता येत नव्हते. ‘नागपूरला पैसे कसे पाठवायचे ?’, अशी माझी अडचण होती. तेव्हा सायंकाळचे ७ वाजले होते. त्यामुळे मी अधिकोषातून पैसे काढू शकत नव्हतो. ‘लगेच एवढे पैसे कुठून द्यायचे ?’, हे मला कळत नव्हते.
मी आमच्या ओळखीच्या दुकानदाराला भ्रमणभाषवर माझ्या अडचणीविषयी सांगितले. खरेतर ते सायंकाळी कुणाला पैसे देत नाहीत; परंतु मी त्यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी लगेच ‘ऑनलाईन’ पैसे पाठवले. अशा प्रकारे मला श्री गुरूंची कृपा अनुभवता आली.’
२. सौ. सुमन दुसे, बडनेरा, अमरावती.
२ अ. रुग्णाईत असतांना अनुभवलेली गुरुकृपा !
१. रुग्णालयात असतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडून गुरुस्मरण आणि नामजप होत होता. त्यातून मला आनंद मिळत होता.
२. रुग्णालयात असतांनाही मला भक्तीसत्संग ऐकायला मिळाला.
३. मला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी साधारण दीड महिना घशात नळी (Tracheostomy tube) घालून ठेवली होती. ती नळी काढल्यावर आधुनिक वैद्य मला म्हणाले, ‘‘तुम्ही आता बोलू शकता. तुमचे नाव सांगा.’’ तेव्हा मी प्रथमच ‘जय गुरुदेव, जय गुरुदेव’, असे म्हणाले.
४. एकदा आजारपणामुळे मला नैराश्य आले होते. तेव्हा मी भ्रमणभाषवर सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकरकाका (वय ७२ वर्षे) यांच्याशी बोलले. त्यानंतर माझ्या मनाची स्थिती सकारात्मक झाली.
२ आ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे आपण जिवंत आहोत’, हे सूचित करणारी आलेली अनुभूती ! : १८.११.२०२१ या दिवशी रात्री, म्हणजेच वैकुंठचतुर्दशीच्या रात्री झोपतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ जवळ घेऊन मी परात्पर गुरु डॉक्टरांना आत्मनिवेदन करत होते. तेव्हा मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले, ‘एक बाई आमच्या घराच्या बाहेर काढलेल्या रांगोळीजवळ उभी होती. तिचा तोंडवळा काळा होता आणि केस मोकळे होते. ती परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राकडे हात दाखवून ओरडून मला सांगत होती, ‘यांच्यामुळे मी या घरात येऊ शकत नाही आणि तुम्हाला काही करू शकत नाही.’ तेव्हा मला ‘आपण परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे जिवंत आहोत’, असे वाटून त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटली.’ (क्रमशः) (सर्व सूत्रांचा दिनांक : १९.३.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |