अहिल्यानगर येथे सनातन संस्थेच्या वतीने बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !

निसर्गाेपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांच्‍या मार्गदर्शनानुसार बिंदूदाबन उपचार शिकून घेतांना साधक

अहिल्यानगर – येणारा आपत्काळ कसा असू शकतो ? हे कुणी सांगू शकत नाही. कोरोना महामारीच्या काळात हे बहुतेकांनी अनुभवले आहे. पुढे भीषण आपत्‍काळ येऊ शकतो. तेव्हा आधुनिक वैद्य उपलब्ध होतीलच, असे नाही. पुढील काळात उपचार मिळावेत, या दृष्टीने बिंदूदाबन उपचार शिकणे महत्त्वाचे आहे. रुग्णांच्या वेदना अल्प करता येण्यासाठी बिंदूदाबन उपचार पद्धती वापरता यावी, यासाठी अहिल्यानगर येथे ३ दिवसांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सनातन संस्थेचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.

मणक्याचे आजार, गुडघ्याचे आजार, पोटाचे विकार असे विविध आजार असणार्‍या ४० रुग्णांवर डॉ. दीपक जोशी यांनी उपचार केले. उपचारानंतर रुग्णांनी ‘बरे वाटले’, असे सांगितले. उपाशीपोटी रुग्णांची पडताळणी कशी करावी ? बिंदू दाबण्याची तात्त्विक माहिती, हात-पाय यावरील प्रत्येक बिंदूचे कार्य, मणक्याचा आजार बिंदूदाबनाद्वारे कसा अल्प करावा ? याविषयी डॉक्टर जोशी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्रात्यक्षिक आणि सरावही घेण्यात आला.