शिरस्त्राण सक्तीविरोधात दुचाकीस्वार अप्रसन्न
पुणे – राज्यातील गेल्या ५ वर्षांतील रस्ते अपघातांचा आढावा घेतल्यानंतर विनाशिरस्त्राण दुचाकीस्वार आणि सहप्रवाशी यांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, तसेच घायाळांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींप्रमाणे विनाशिरस्त्राण दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त अन् पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत. आतापर्यंत केवळ विनाशिरस्त्राण असलेल्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. आता सहप्रवाशांनी शिरस्त्राण घातले आहे कि नाही, हे पडताळले जाणार आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांकडून या शिरस्त्राण सक्तीविषयी संताप व्यक्त होत आहे. सहप्रवाशांवर कारवाई करण्यासाठी सध्या असलेल्या वाहतूक पोलिसांच्या ‘इ-चलन’ यंत्रांमध्ये पालट करण्यात आला आहे.
पुणे शहरामध्ये विनाशिरस्त्राण वाहनचालकांवर सीसीटीव्हीद्वारे प्रतिदिन ४ सहस्र चालकांवर कारवाई केली. त्यातून दंड भरणार्यांची संख्या अल्प आहे. त्यामुळे दंडाची प्रकरणे ‘लोक अदालती’मध्ये ठेवण्यात येतात. तेव्हा बहुतेक वाहनचालक दंड भरतात, असे दिसून येत आहे.