पोलिसांचे अफझलप्रेम !

आतंकवाद असाच संपवावा लागतो !

महाराष्ट्र पोलीस दलाचे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’, असे ब्रीदवाक्य असले, तरी ते कागदावर लिहिण्यापुरतेच आहे. बर्‍याचदा पोलिसांचे वागणे याच्या बरोबर उलट असते. याचाच प्रत्यय पुणेकरांना पुन्हा एकदा आला. कोरोनाच्या काळानंतर यंदा राज्यात सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याची घोषणा नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानुसार विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची सिद्धता आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोथरूड येथील ‘संगम तरुण गणेशोत्सव मंडळा’ला यंदा ‘अफझलखानवध’ या विषयावरील जिवंत देखावा सादर करायचा होता. तशी अनुमती त्याने पुणे पोलिसांकडे मागितली; परंतु पोलिसांनी नेहमीप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था यांचे कारण पुढे करत ती नाकारली. या मंडळाकडून प्रतिवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित देखावे सादर केले जातात. त्याला अनुसरून मंडळाने यंदा अफझलखान वधाचा देखावा सादर करण्याचे निश्चित केले होते. पोलिसांचा विरोध झुगारून ‘संगम तरुण गणेशोत्सव मंडळ’ अफझलखान वधाचा देखावा सादर करण्यावर ठाम होते. यासह या देखाव्याला अनुमती मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याचे घोषित केले होते. पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वच स्तरांवरून त्यांना विरोध होऊ लागल्यावर पोलिसांना जाग आली अन् काही अटी-शर्थी घालत पोलिसांनी या देखाव्याला अनुमती दिली. या सर्व घडामोडींमध्ये पोलिसांच्या केवळ हिंदूंपुढे चालणार्‍या मर्दुमकीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मुळात हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहे. महाराजांनी स्वतःच्या, रयतेच्या आणि स्वराज्याच्या जिवावर उठलेल्या क्रूरकर्मा मोगलांना धूळ चारली. पाच पातशाह्यांना नामोहरम करून भव्य दिव्य हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मग त्यांच्याच राज्यात त्यांच्याच पराक्रमाचा इतिहास मांडायला अनुमती हवीच कशाला ? अशी अनुमती घ्यावी लागणे, हा त्यांच्या पराक्रमाचा अवमानच आहे. दुसरे म्हणजे ‘अफझलखान वधाचा प्रसंग दाखवल्यामुळे कुणाच्या भावना दुखावतात ?’, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे अशा गोष्टींना प्रथम अनुमती न देण्याचा पोलिसांचा निर्णय केवळ भयापोटी होता. अफझलखान हा काही हिंदवी स्वराज्याचा हितचिंतक नव्हता, तर शत्रू होता. त्याचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराज यांनी बाहेर काढून ‘आतंकवाद असाच संपवावा लागतो’, हे जगाला दाखवून दिले. आज जगभरातील अनेक देशांत आणि तेथील सैन्य दलांत प्रतापगडाच्या युद्धाचा प्रसंग अभ्यास म्हणून शिकवला जातो, तर आपल्याकडील पोलिसांना आणि मागील काही वर्षांतील शासनकर्त्यांना तो मुसलमानांच्या भावना भडकावणारा वाटतो, हे खेदजनक नव्हे, तर संतापजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात ‘भयापोटी सत्य इतिहास दडपणारे रहाण्याच्या पात्रतेचे आहेत का ?’, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

पोलिसांचे पत्र

समुपदेशन अफझलप्रेमींचेही करा !

पुणे पोलिसांना कर्तृत्व दाखवण्यापेक्षा समुपदेशन करण्यात अधिक रस आहे. काही वर्षांपूर्वी इराक आणि सीरिया येथे ‘इसिस’ या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेने प्रचंड रक्तपात करून जगभरात दहशत निर्माण केली होती. या रक्तपाताला तिने ‘जिहाद’ संबोधून त्यात जगभरातील मुसलमानांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भारतातून असंख्य धर्मांध इसिससाठी काम करण्यास आणि त्यासाठी सीरियाला जाण्यास सिद्ध झाले. त्यातच पुण्यातील एका धर्मांध मुलीचाही समावेश होता. त्यामुळे ‘पोलीस तिला अटक करतील’, असे सर्वांना वाटत असतांनाच पोलिसांनी गांधीगिरी दाखवत तिचे समुदेशन करण्याचा निर्णय घेतला. यावर सर्व थरांतून टीका झाली; परंतु पोलिसांनी त्या मुलीच्या समाजातील धर्मगुरूंच्या साहाय्याने तिचे समुदेशन केले, जे नंतर पूर्णपणे फोल ठरल्याचे दिसून आले; कारण कालांतराने हीच मुलगी काश्मीरमध्ये एका घटनेत पोलिसांना आढळून आली होती. मग असेच समुपदेशन पोलीस अफझलखान वधामुळे भावना दुखावणार्‍यांचे का करत नाहीत ? त्यांच्या मनावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास का कोरत नाहीत ? जे गुन्हा करायला निघाले आहेत, त्यांचे पोलीस समुदेशन करतात आणि ज्यांनी काहीही गुन्हा केलेला नाही, अशांना देखावाही सादर करण्याची अनुमती नाकारतात ! हा कुठला न्याय आहे ? अफझलखान वधाच्या इतिहासाला विरोध करणे, म्हणजे थेट छत्रपती शिवाजी महाराजांनाच विरोध करणे होय. आज अफझलखान वधाच्या इतिहासाला विरोध करणारे उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही कुणाला उच्चारू देणार नाहीत. त्यामुळे हिंदूंचे उरलेसुरले क्षात्रतेजही नष्ट होईल आणि तेव्हा अफझलप्रेमी हिंदूंच्या उरावर बसतील. असे होऊ द्यायचे नसेल, तर हिंदूंनी संघटित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोचवला पाहिजे.

‘सर तन से जुदा’ कसे चालते ?

नूपुर शर्मा प्रकरणानंतर हिंदूंना आजही उघड उघड ‘सर तन से जुदा’ अर्थात् शिरच्छेद करण्याच्या धमक्या मिळत आहेत. काही ठिकाणी तर तसे प्रत्यक्ष करण्यातही आले आहे. ‘अशी धमकी देणार्‍यांवर पोलिसांनी काय कारवाई केली आहे ?’, हे जनतेला कळले पाहिजे. अफझलखान वधाचा इतिहास न चालणार्‍या धर्मांधांना आणि पोलिसांना ‘सर तन से जुदा’सारख्या धमक्या दिलेल्या कशा चालतात ? अशा धमक्यांनी कुठली कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते ? हा पोलिसांचा दुटप्पीपणा आहे. कायदा आणि सुव्यवस्था यांचे कारण पुढे करून पोलीस अफझलखान वधाच्या देखाव्याला विरोध करत असतील, तर हा इतिहासाचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. वस्तूतः आजच्या पोलिसांनी हिंदवी स्वराज्याच्या मावळ्यांची, म्हणजेच रक्षकांची भूमिका वठवायला हवी; पण आज त्याउलट होतांना दिसत आहे. आताचे पोलीस हे मावळ्यांसारखे नाहीत; कारण कुठलेही राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांसारखे नाहीत, हेच खरे !

अफझलखान वधाच्या इतिहासाला विरोध करणे; म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनाच विरोध करणे होय !