मदुराई – एकाच वाहनातून ३६ गायींची वाहतूक करून त्यांना घायाळ केल्याच्या घटनेची नोंद घेत मद्रास उच्च न्यायालयाने एका व्यक्तीला प्राण्यांवर क्रूर अत्याचार केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवले. आरोपीच्या विरोधात भारतीय दंड संहिता आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या गायी कह्यात देण्याची मागणी करणारी याचिका कृष्णमूर्ती अरुप्पुकोट्टाई याने उच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती. यासह त्याने या याचिकेत गायी त्याच्या कह्यात न देण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या आदेशालाही आव्हान दिले होते. या वेळी अरुप्पुकोट्टाई याने गावातील दुष्काळी परिस्थितीमुळे गुरे इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतल्याचे न्यायालयाला सांगितले. तथापि पोलिसांनी ‘अरुप्पुकोट्टाई याचा या गायींची हत्या करण्याचाच उद्देश होता’, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर न्यायालयाने अरुप्पुकोट्टाई याची मागणी फेटाळून लावत या गायी विरुधीनगर येथील ‘बचाव ट्रस्ट’कडे सुपुर्द केल्या.