हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे अनेकांचा मृत्यू

पंजाबला जोडणारा रेल्वे पूल कोसळला

शिमला (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे गेल्या २४ घंट्यांत चंबा जिल्ह्याच्या भटियामध्ये ३, तर मंडी जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. कांगडा जिल्ह्याच्या शाहपूरमध्ये घर कोसळल्यामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. चंबा आणि मंडी जिल्ह्यांत १५ हून अधिक जण बेपत्ता आहेत. हमीरपूरमध्ये १० ते १२ घरे नदीत बुडाली आहेत. येथील १९ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दुसरीकडे कांगडामध्ये मुसळधार पावसामुळे चक्की नदीवरील पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांना जोडणारा रेल्वे पूल वाहून गेला आहे. प्रशासनाने आठवडाभरापूर्वीच हा पूल असुरक्षित असल्याचे घोषित केले होते. त्यामुळे त्यावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. मंडीच्या गोहरमध्ये दरड कोसळल्यामुळे काशन पंचायतीच्या जडोन गावातील एकाच कुटुंबातील ८ सदस्य दबले गेले आहेत. या ठिकाणी युद्धपातळीवर साहाय्यकार्य करण्यात येत आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे १ सहस्र १३५ कोटी रुपयांच्या सरकारी आणि खासगी संपत्तीची हानी झाली आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील ९६ घंट्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मंडी जिल्हा प्रशासनाने मुसळधार पावसामुळे शाळा बंद ठेवल्या आहेत. चम्बा आणि कुल्लू येथीलही शाळा बंद आहेत. उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसामुळे हानी वित्त आणि जीवित हानी झाली आहे.