नवी देहली – रशियामध्ये होणार्या ‘जागतिक सैनिक सरावा’त भारत आणि चीन यांचे सैनिक एकत्र सराव करतांना दिसणार आहेत. सध्या पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांमध्ये दोन वर्षांहून अधिक काळापासून तणावाची स्थिती आहे. चीनने नुकतीच ‘वोस्टोक-२०२२’ सैनिकी सरावात सहभागी होण्याची घोषणा केली. ‘वोस्टोक-२०२२’ सैनिकी सराव ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. या सरावात भारतीय सैनिकही सहभागी होणार आहेत. भारतासह बेलारूस, ताजिकिस्तान, मंगोलिया आदी देशही या सरावात सहभागी होणार आहेत.
‘वोस्टोक-२०२२’ सैनिकी सरावात सहभागी देशांच्या सैन्यांसमवेत व्यावहारिक आणि मैत्रीपूर्ण सहकार्य वाढवणे, हे चीनच्या सैन्याचे उदिष्ट आहे, असे चीनच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे. भारताने या सरावाविषयी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. या सरावात सैनिक पूर्वेकडील भागात सैनिकी सुरक्षा राखण्यासाठी उपाययोजना आखतील, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
गेल्या वर्षी रशियामध्ये झालेल्या ‘जेपेड-२०२१’ सैनिकी सरावात भारतही सहभागी झाला होता. त्यामध्ये चीन आणि पाकिस्तान यांच्यासह १७ देशसुद्धा सहभागी झाले होते.